
चिपळूण नगर पालिका निवडणूकीतराष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार मिलिंद कापडी यांची माघार
चिपळूण नगर पालिका सार्वत्रिक निवडणुकीत अजितदादा पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मिलिंद कापडी यांनी आज (गुरुवार) आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. या निर्णयामुळे शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
चिपळूणमध्ये महायुती होणार की महाविकास आघाडी पुढे येणार, याबाबत अद्यापही स्पष्ट चित्र नाही. घटक पक्षांच्या हालचाली मात्र जोरात सुरू आहेत. शिंदे गट शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनी नगराध्यक्षपदाचा अर्ज दाखल केला होता. तर राष्ट्रवादीकडून मिलिंद कापडी यांनीही अर्ज दाखल करून स्पर्धा चुरशीची होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
दरम्यान, बुधवारी आमदार शेखर निकम यांनी नगराध्यक्षपदाच्या लढतीतून माघार घेण्याचे जाहीर केले. मात्र नगरसेवक पदासाठी त्यांनी भरलेले अर्ज कायम राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप युती निश्चित झाल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे चिपळूण नगर पालिका निवडणुकीत महायुतीचे दोन्ही पक्ष एकत्रितपणे उमेदवार देणार असल्याची शक्यता आहे. महायुतीमध्ये अजित पवार गट राष्ट्रवादी असेल का हे लवकरच स्पष्ट होईल.



