
कायदेशीर दत्तक विधान प्रक्रिया करुन बाळ दत्तक घ्यावे- जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनोज पाटणकर
रत्नागिरी 19 ): बेकायदेशीरपणे बाळ दत्तक घेणे हा गुन्हा आहे. ज्या पालकांना बाळ दत्तक घ्यायचे आहे अशा सर्व दत्तक इच्छुक पालकांनी महिला व बाल विकास विभागामार्फत कायदेशीर दत्तक विधान प्रक्रिया करुन बाळ दत्तक घ्यावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनोज पाटणकर व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समृध्दी वीर यांनी केले आहे. दत्तक योजनेतून बाळ दत्तक घेवू इच्छिणाऱ्या पालकांनी केंद्र शासनाच्या https://missionvatsalya.wcd.gov.in या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करावे. बाळ दत्तक घेण्यासंदर्भातील अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय (दूरध्वनी क्र. 02352-220461) या क्रमांकावर संपर्क साधावा.
शासनाच्या मार्गदर्शिकेनुसार महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय अंतर्गत “नोंव्हेंबर 2025 राष्ट्रीय दत्तक जागरुकता महिना निमित्त” विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील 0 ते 18 वयोगटातील दिव्यांग बालकांचे पुनर्वसन, कायदेशीर दत्तक प्रक्रिया हा मुख्य उद्देश असून त्या अनुषंगाने जिल्ह्यातील 0 ते 18 वयोगटातील जी बालके 40 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक दिव्यांग आहेत त्या बालकांना बाल संगोपन योजना व दत्तक योजनेमार्फत पुनर्वसन करण्यात येत आहे.
राष्ट्रीय दत्तक जागरुकता महिना निमित्त जिल्ह्यात महिला व बाल विकास विभागामार्फत बालकांच्या बाबतीत कार्य करणाऱ्या सर्व संस्था, सर्व यंत्रणा यांची संयुक्त बैठक घेणे, दत्तक पालक यांची बैठक घेणे, पालकांना समुपदेशन, जनजागृती रॅली, पथनाट्य इत्यादी कार्यक्रमातून कायदेशीर दत्तक विधान प्रक्रिया, प्रतिपालकत्व योजना याबाबत प्रचार व प्रसिध्दी करण्याकरीता विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.




