
एस. टी. आगारातील गर्दीत ६५ वर्षीय महिलेची ५० हजारांची सोन्याची बोरमाळ चोरी
संगमेश्वर: तालुक्यातील देवरूख एस. टी. आगारात प्रवाशांच्या प्रचंड गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने ६५ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सुमारे ५०,००० रुपये किंमतीची सोन्याची बोरमाळ लंपास केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. याप्रकरणी देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सावित्री सखाराम कुराडे (वय ६५, रा. बामणोली, मावळतीवाडी, ता. संगमेश्वर) यांनी या चोरीची फिर्याद दिली आहे. १६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास त्या देवरूख एस.टी. स्टँडवर बामणोलीला जाण्यासाठी उभ्या होत्या. चुकून त्या कुंडी बेलारीकडे जाणाऱ्या बसमध्ये चढू लागल्या. बसमध्ये त्या वेळी प्रवाशांची मोठी गर्दी होती.
बस बामणोलीकडे जात नसल्याचे लक्षात येताच त्या उतरण्यास लागल्या. याच वेळी झालेल्या ढकलाढकलीत त्यांच्या बोरमाळेला लावलेली सेफ्टी पिन खाली पडली. या गोंधळात अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील १२.५ ग्रॅम वजनाची सोन्याची बोरमाळ चोरून नेली.
प्रकार लक्षात येताच महिलेने तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला. गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याचा शोध सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजसुद्धा तपासले जात आहेत
..




