
‘सरदार@150 युनिटी मार्च’ पदयात्रा 20 नोव्हेंबर रोजीएकतेचा जयघोष, राष्ट्रीय अभिमान, एकता आणि स्वावलंबनाचा संदेश नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे….
रत्नागिरी, दि. 18 ):-b जिल्हा प्रशासन, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत माय भारत केंद्र, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग (माध्य.),राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने “सरदार@150 युनिटी मार्च” आणि “विकसित भारत पदयात्रा” या उपक्रमाचे आयोजन 20 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात आले आहे. सकाळी 8 वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमपासून पदयात्रेला प्रारंभ होईल. सर्व नागरिकांनी या ऐतिहासिक पदयात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.
या उपक्रमाचा उद्देश तरुणांमध्ये राष्ट्रीय अभिमान, सामाजिक जबाबदारी आणि एकतेची भावना निर्माण करणे हा आहे. या पदयात्रेद्वारे तरुणांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण राष्ट्राच्या ऐक्य, अखंडता आणि देशभक्तीच्या भावनांना पुनरुज्जीवित करतील. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकसंध भारताच्या विचारांना स्मरून एकात्म भारताच्या निर्मितीचा संकल्प या माध्यमातून घेतला जाणार आहे.
६ ऑक्टोबर २०२५ रोजी भारत सरकारने माय भारत पोर्टलवरून ‘सरदार@१५० युनिटी मार्च’ या डिजिटल मोहिमेची सुरुवात केली. या उपक्रमात सोशल मीडिया रील स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा आणि सरदार@१५० यंग लीडर्स प्रोग्रामचा समावेश आहे. या प्रोग्राममधील १५० विजेत्यांना राष्ट्रीय पदयात्रेत सहभागी होण्याची संधी दिली जाणार आहे.
प्रत्येक जिल्ह्यात ६ ते ८ कि.मी. लांबीची पदयात्रा काढली जाईल. शाळा व महाविद्यालयांमध्ये निबंध, वादविवाद, परिसंवाद, पथनाट्य आदी उपक्रम, नशामुक्त भारत व ‘अभिमानाने स्वदेशी’ अशा प्रतिज्ञा अभियानासह योग, आरोग्य व स्वच्छता मोहिम आयोजित करण्यात येणार आहे. पदयात्रे दरम्यान सरदार पटेल यांच्या प्रतिमेस अभिवादन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रमाणपत्र वितरण केले जाईल.
करमसद (पटेल यांचे जन्मस्थान) ते केवडिया (स्टॅच्यू ऑफ युनिटी) असा १५२ कि.मी. प्रवास होईल. मार्गावरील गावांमध्ये सामाजिक विकास उपक्रम, ‘डेव्हलपिंग इंडिया प्रदर्शन’ आणि ‘सरदार गाथा’ सादर केली जाईल.
सर्व नोंदणी माझे भारत पोर्टलवर https://mybharat.gov.in/pages/unity_march सुरू आहे. देशभरातील तरुणांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून “एक भारत, श्रेष्ठ भारत” या संकल्पनेला प्रत्यक्षात आणावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




