
रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून नाटे सागरी पोलीस ठाण्याचा गौरव
राजापूर : तालुक्यातील नाटे सागरी पोलीस ठाण्याची राज्यस्तरावर दखल घेतली असून पोलीस ठाण्याच्या उत्कृष्ट गुन्हे उकल, आयएसओ मानांकन आणि सीसीटीएनएस (CCTNS) कार्यातील यशामुळे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला आहे.
नाटे सागरी पोलीस ठाण्याने अलीकडच्या काळात विविध आघाड्यांवर उल्लेखनीय कामगिरी करून जिल्हा पोलीस दलात एक भक्कम स्थान निर्माण केले आहे. गुन्हे उकल, प्रशासकीय शिस्त, तांत्रिक कामकाज आणि नागरिकाभिमुख सेवा या सर्व क्षेत्रांत या पोलीस ठाण्याने सातत्यपूर्ण प्रगती साधली आहे.
या सर्व कामगिरीची दखल घेऊन रत्नागिरी जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री. बगाटे यांच्या हस्ते नाटे पोलीस ठाण्याचा विशेष सत्कार करण्यात आला.
नाटे पोलीस ठाण्याने स्मार्ट सिटी पोलीस ठाणे म्हणून आयएसओ मानांकन प्राप्त केले असून, आधुनिक सुविधा, डिजिटल कामकाज, तांत्रिक पर्यवेक्षण आणि पारदर्शक सेवांचा प्रभावी वापर यामुळे नाटे पोलीस ठाण्याची जिल्ह्यातील कामगिरी अधिक उजवी ठरत आहे.
गुन्हे तपासात ठाण्याने महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे. गुन्हा रजिस्टर क्र. ७४/२०२५ (बीएनएस ३०३(२)) या गुन्ह्यातील १ लाख ४७ हजार किंमतीचा मुद्देमाल पुण्यातून शोधून काढण्यात नाटे पोलिसांना यश मिळाले. अचूक तपास, तांत्रिक माहितीचा योग्य वापर आणि तत्काळ कारवाईमुळे हा गुन्ह्याची अल्पावधीत उकल करण्यात आली होती.
त्याचप्रमाणे गुन्हा रजिस्टर क्र. ७५/२०२५ (बीएनएस ३०५(ड), ३२४(३), ३३१(२)) या घरफोडीच्या गुन्ह्याची केवळ १२ तासांत उकल करून सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणांतील वेगवान आणि प्रभावी तपासाबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना पोलीस अधीक्षक श्री. बगाटे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.
तांत्रिक कामकाजातही नाटे पोलीस ठाण्याने उल्लेखनीय प्रगती केली आहे. सीसीटीएनएस प्रणालीमध्ये जिल्हास्तरावर दुसरा क्रमांक मिळवण्याचा मान नाटे पोलीस ठाण्याला मिळाला असून, या विभागाचे काम प्रभावीपणे सांभाळल्याबद्दल अंमलदार सुप्रिया बांदकर यांना देखील पोलीस अधीक्षक बगाटे यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.




