
लांजा नगरपंचायत निवडणुकीत महायुतीची ताकद दिसली — सावली कुरूप यांचा नगराध्यक्षपदाचा अर्ज १७ नगरसेवक उमेदवारांसह दाखल
लांजा : आगामी लांजा नगरपंचायत निवडणुकीत महायुतीतर्फे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून सावली कुरूप यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या सोबत महायुतीच्या पॅनेलमधील १७ नगरसेवक उमेदवारांनीही आपली उमेदवारी दाखल केली.
उमेदवारी अर्ज दाखल करताना आमदार किरण सामंत हे विशेष उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ढोल-ताशांच्या गजरात आणि समर्थकांच्या घोषणाबाजीमध्ये उत्साहात पूर्ण झाली.
महायुतीने एकजूट आणि विकासाभिमुख भूमिकेसह निवडणुकीत उतरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसह १७ नगरसेवक उमेदवार अर्ज दाखल झाल्याने लांज्यातील निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
यामध्ये प्रभाग एक सर्वसाधारण महिला (शिवसेना) निधी निलेश गुरव, प्रभाग दोन सर्वसाधारण (शिवसेना) पंढरीनाथ बाळकृष्ण मायशेट्ये, प्रभाग तीन नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला (शिवसेना) श्रद्धा तोडकरी, प्रभाग चार अनुसूचित जाती महिला (शिवसेना) सानिका समीर जाधव, प्रभाग सहा सर्वसाधारण (शिवसेना) योगेश कावतकर,प्रभाग आठ सर्वसाधारण (शिवसेना) महेश बामणे,प्रभाग नऊ सर्वसाधारण (शिवसेना) दिलीप मुजावर,
प्रभाग दहा सर्वसाधारण महिला (भाजप) प्रणाली तेली, प्रभाग अकरा सर्वसाधारण महिला (शिवसेना) नीलिमा कनावजे,प्रभाग बारा सर्वसाधारण महिला (राष्ट्रवादी घड्याळ) शमा धोडगे, प्रभाग तेरा नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला (शिवसेना) साक्षी मानकर, प्रभाग चौदा सर्वसाधारण (शिवसेना) वैभव जोइल,प्रभाग पंधरा नागरिकाचा मागास प्रवर्ग (शिवसेना) मनोहर बाईत,प्रभाग सोळा नागरिकाचा मागास प्रवर्ग (शिवसेना) दीपक निवले,प्रभाग सतरा सर्वसाधारण महिला (शिवसेना) शिवन्या काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
लांजा नगरपंचायतवर महायुतीचा भगवा फडकवणार: आमदार किरण सामंत यांचा निर्धार
नगरपंचायत निवडणुकीत महायुती प्रबळ शक्ती म्हणून पुढे येणार असून “लांजा नगरपंचायतवर महायुतीचा भगवा फडकवणार” असा ठाम निर्धार आमदार किरण सामंत यांनी व्यक्त केला. या वेळी नगराध्यक्ष पदाच्या महायुतीच्या उमेदवार सावली कुरूप यांच्यासह महायुतीतील इतर नगरसेवक उमेदवारांची ओळख करून देण्यात आली. सामंत यांनी महायुतीच्या एकजुटीवर तसेच विकासाभिमुख भूमिकेवर भर देत जनतेचा विश्वास निश्चितच आपल्याला लाभेल, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनीही सामंत यांच्या घोषणेवर उत्स्फूर्त प्रतिसाद देत निवडणुकीत महायुतीचा झेंडा उंचावण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले. लांजा शहरात या घोषणेने राजकीय वातावरण अधिक तापले आहे या उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेना भाजप आरपीआय राष्ट्रवादी या महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.




