
राजापूर नगर पालिकेसाठी आणलेल्या ईव्हीएमवर आढळले मध्यप्रदेश निवडणूक नाव! जिल्हाधिका-यांकडे तक्रार!!
- रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर नगर पालिकेच्या निवडणुकीसाठी आणण्यात आलेल्या निवडणूक ईव्हीएमवर ”मध्यप्रदेश निवडणूक’ असे नाव आढळल्याने चांगलाच गोंधळ उडाला आहे. यावर आक्षेप घेत काँग्रेसचे शहराध्यक्ष अजीम जैतापकर यांनी जिल्हाधिकारी जिंदल यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
राजापूर नगर पालिकेच्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडुन तयारी पुर्ण करण्यात आली आहे. मात्र, या निवडणुकीसाठी आणलेल्या ईव्हीएम मशीनवर ‘मध्यप्रदेश निवडणूक’ असे स्पष्ट लिहिलेले आढळल्याने काँग्रेस शहराध्यक्ष अजीम जैतापकर यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. याविषयी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. जैतापकर यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले की, शुक्रवारी ईव्हीएम मशीन सील करताना नगरपरिषदेकडून त्यांना उपस्थित राहण्याची सूचना देण्यात आली होती. त्या वेळी मशीनच्या पेट्या उघडून पाहण्यात आल्या. मात्र या सर्व ईव्हीएमवर ‘मध्यप्रदेश निवडणूक’ अशी नोंद दिसून आली.
महाराष्ट्रातील राजापूर नगर पलिकेची निवडणूक असताना इतर राज्यातून आलेल्या मशीनवर निवडणूक घेणे संशयास्पद आहे. त्यामुळे या मशीनचा वापर का केला जात आहे, याबाबत खुलासा करावा किंवा महाराष्ट्रातील ईव्हीएम मशीन बदलून देण्यात यावेत, अशी मागणी जैतापकर यांनी केली आहे.
याविषयी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले की, ईव्हीएम मशीन जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेले आहेत आणि शंका असल्यास त्यांच्याकडे दाद मागावी. त्यानुसार जैतापकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांनाही पत्र पाठवून या मशीनबाबत तक्रार दाखल केली आहे. आता या तक्रारीनंतर
जिल्हाधिकाऱ्यांकडून काय कार्यवाही केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.




