
माजी पंतप्रधान शेख हसीना यांना धक्का; मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांत दोषी, न्यायालयाने सुनावली मृत्युदंडाची शिक्षा!
- बांगलादेशात ऑगस्ट २०२४ मध्ये मोठ्या घडामोडी घडल्या होत्या. मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता आणि त्यामध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे झालेल्या उठावानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन अखेर देश सोडला होता. तेव्हा शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला होता. दरम्यान, आता शेख हसीना यांना धक्का देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे.
माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने (ICT-BD) सोमवारी मोठा निर्णय दिला आहे. मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या प्रकरणात शेख हसीना यांना न्यायालयाने दोषी ठरवलं असून थेट मृत्युदंडाची (फाशीची शिक्षा) शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे शेख हसीना यांचे समर्थक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
दरम्यान, शेख हसीना यांना न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावल्यामुळे त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे बांगलादेशामध्ये काहीसा तणाव वाढला असून काही महत्वाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेले आहेत. वृत्तानुसार, माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर निशस्त्र आंदोलकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिल्याचा गंभीर ठपका ठेवत शेख हसीना यांना दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनलने हा निर्णय दिला आहे.




