
बंडखोरी टाळण्यासाठी पक्षाशी तडजोड, भाजपाचे तीन उमेदवार शिवसेनेकडून लढणार
रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत सिंधुदुर्ग पॅटर्न राबविण्यात येत आहे भाजपचे माजी नेते निलेश राणे यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिंदे शिवसेनेतर्फे उमेदवारी मिळवून निवडणूक जिंकली होती तसंच पॅटर्न आता रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत अवलंबिला जात आहे भाजपचे प्रबळ दावेदार मानले जाणारे तीन इच्छुक उमेदवार आता शिवसेनेकडून निवडणूक लढवणार आहेत. यामध्ये राजीव कीर (प्रभाग क्र. ६), मेधा कुलकर्णी (प्रभाग क्र. ६) आणि सुशांत उर्फ मुन्ना चवंडे (प्रभाग क्र. १५) हे तिन्ही उमेदवार आपापल्या प्रभागात भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते आणि प्रभावी दावेदार म्हणून ओळखले जात होते.
महायुतीमधील जागावाटपावरून आणि तिकीट न मिळाल्यास इच्छुकांकडून होणाऱ्या बंडखोरीच्या भीतीने मोठा पेच निर्माण झाला होता. हा तिढा सोडवण्यासाठी रविवारी रात्री उशिरापर्यंत दोन्ही पक्षांच्या (भाजप आणि शिवसेना) वरिष्ठ नेत्यांमध्ये महत्त्वाच्या बैठकांचे सत्र सुरू होते.
अखेर, या तीन महत्त्वाच्या जागांवर भाजपच्या निष्ठावान इच्छुकांना शिवसेनेच्या चिन्हावर लढवण्याची ‘तडजोड’ करण्यात आली. हा ‘शिवसेना पॅटर्न’ महायुतीने बंडखोरी टाळण्यासाठी आणि सर्व प्रमुख इच्छुकांना निवडणुकीत उतरवण्यासाठी ऐनवेळी अमलात आणल्याचे बोलले जात आहे.




