
सिंधुदुर्ग जिल्ह्यात युती झाली तर ठीक, अन्यथा स्वबळावर लढण्याची तयारी- दीपक केसरकर
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगामी नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीबाबत बोलताना शिवसेनेचे (शिंदे गट) माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे. युती होण्यासाठी भाजप आणि शिवसेनेच्या दोन्ही नेत्यांचे प्रयत्न सुरू असून, युती झाली तर ठीक, अन्यथा स्वबळावर लढण्याची तयारी ठेवू, असे त्यांनी स्पष्ट केले.आ. केसरकर म्हणाले, युती होण्यासाठी दोन्ही बाजूंकडून प्रयत्न सुरू आहेत आणि बोलणी अद्यापही सुरू आहेत. याबाबतचा निर्णय वरिष्ठ घेणार आहेत, पण नेमकी भूमिका वरिष्ठांनी जाहीर केलेली नाही. त्यामुळे चर्चा होईपर्यंत थांबणे चुकीचे ठरणार आहे. युती झाली तर ठीक अन्यथा स्वबळावर लढण्याची आमची तयारी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. स्वबळावर लढण्याच्या द़ृष्टीने सर्व उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज ऑनलाईन भरले असल्याचेही त्यांनी नमूद केले.




