
रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात १० घरफोड्या करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद
आलिशान कारमधून उच्चभ्रू सोसायट्यांची रेकी (पाहणी) करून भरदिवसा घरफोडी करणार्या एका आंतरराज्य टोळीला रायगड पोलिसांनी मोठी कारवाई करत गजाआड केले. रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या या धडक कारवाईमुळे रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यातील एकूण १० घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आले आहेत. या आंतरराज्य टोळीला पुढील तपासासाठी रत्नागिरी पोलीस लवकरच ताब्यात घेणार आहेत.
ही टोळी अत्यंत पद्धतशीरपणे गुन्हे करत होती. ते आलिशान कारचा वापर करून उच्चभ्रू सोसाट्यांमधील बंद घरे हेरत असत. संधी साधून घरांचे कुलूप तोडून मौल्यवान दागिने आणि रोकड लंपास करण्याची त्यांची योजना होती. रायगड जिल्ह्यातील पाली, रोहा, महाड आणि श्रीवर्धन येथील वाढत्या घरफोडीच्या घटनांमध्ये एकाच कारचा वापर होत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले होते.
या टोळीचा मुख्य सूत्रधार शाहनवाज इकराम कुरेशी (५०) याला पकडण्यासाठी रायगड पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. रायगड पोलिसांच्या पथकाने महिनाभर आरोपींच्या उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील सिंकदराबाद परिसरात वेषांतर करून माहिती गोळा केली आणि अखेर कुरेशीला ताब्यात घेतले. कुरेशीसह त्याचे साथीदार शमीम इस्लाम कुरेशी, हिना कुरेशी आणि नौशाद कुरेशी यांनाही अटक करण्यात आली आहे. या टोळीकडून चोरीतील १५ लाखांचा मुद्देमाल आणि २४ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.www.konkantoday.com




