
राजापूर तालुक्यातील वाटूळ येथे बिबट्याकडून दुचाकीस्वाराचा पाठलाग, सुदैवाने दुचाकीस्वार बचावला
राजापूर तालुक्यातील वाटूळ येथील बेलाचेकोंडवाडी येथे तरूण अनिरूद्ध अनिल चव्हाण हे सायंकाळच्या सुमारास दुचाकीने जात असताना बिबट्याने त्यांचा पाठलाग केल्याची धक्कादायक घटना घडल्याने वाटूळ परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सुदैवाने या घटनेत अनिरूद्ध यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार अनिरूद्ध चव्हाण आपल्या घराकडून दुचाकीवरून देवळात जात असताना रस्त्याच्या बाजूच्या जंगलातून एक बिबट्या आपल्या दोन बछड्यांसह अचानक बाहेर आला आणि बिबट्याने अनिरूद्ध यांच्या दुचाकीचा पाठलाग केला. प्रसंगावधान राखत अनिरूद्ध यांनी तात्काळ पळ काढला. काही क्षणानंतर बिबट्या बछड्यासह पुन्हा जंगलाच्या दिशेने परत गेला. या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून यासंदर्भात वाडीतील ग्रामपंचायत सदस्य प्रशांत दादा चव्हाण, ग्रामस्थ प्रकाश पांडुरंग चव्हाण, रविंद्र पांडुरंग चव्हाण, रामचंद्र इंदुलकर यांच्यामार्फत वनविभागाकडे तात्काळ निवेदन सादर करण्यात आले. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली.www.konkantoday.com




