
रत्नागिरी व चिपळूणमध्ये शिवसेना उबाठा व राष्ट्रवादीकडून कार्यकर्त्यांच्या आग्रही भूमिकेमुळे निवड प्रक्रिया क्लिष्ठ
महाविकास आघाडीत राजकीय ताकद व परिस्थिती पाहून जागा वाटप करण्याचे अलिखित धोरण असतानाही रत्नागिरी व चिपळूणमध्ये हे धोरण बाजूला पडले आहे. दोन्ही ठिकाणी उबाठा व राष्ट्रवादी हे दोन्ही प्रमुख पक्ष या जागांसाठी आग्रही आहेत. त्यामुळे नगराध्यक्षपदाचा तिढा अधिकच किचकट बनला आहे. माघार घेतली नाही तर उमेदवारी अर्ज भरून टाका, अशा स्पष्ट सूचना उबाठा शिवसेनेच्या वरिष्ठांनी आपल्या इच्छुकांना दिल्याचे वृत्त आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे महाविकास आघाडीच्या पक्षांमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर येत आहेत. विशेषतः रत्नागिरी व चिपळूण नगराध्यक्षपदाच्या जागेवरून उबाठा शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) यांच्यात टोकाचा संघर्ष पहायला मिळत आहे. दोन्ही पक्ष माघार घेण्यास तयार नसल्याने आघाडीची स्थानिक स्तरावरची घडी पूर्णपणे विस्कटल्याचे चित्र आहे.www.konkantoday.com



