
रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीसाठी रविवारी २४ उमेदवारी अर्ज दाखल, आप तर्फे महिला नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल



रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे. आज (१६ नोव्हेंबर) अर्ज भरण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्षांची मोठी झुंबड उडाली होती. आज एकाच दिवशी २४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. आतापर्यंत नगरसेवकपदाच्या ३२ जागांसाठी ४४ च्या वर अर्ज दाखल झालेले आहेत. उद्या (ता. १७) उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे अर्ज दाखल करणाऱ्यांची गर्दी उसळणार आहे.

निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार रविवारी अर्ज भरण्याची मुभा देण्यात आली होती. त्यामुळे महायुती, महाआघाडीसह अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केलेली होती. शक्तीप्रदर्शन करीत उमेदवार नगरपालिकेत अर्ज भरत होते. युती, आघाडीकडून थेट नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरण्यात आलेला नाही. मात्र थेट नगराध्यक्षपदासाठी पहिला उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. आम आदमी पार्टीकडून सुस्मिता सुहास शिंदे यांनी अर्ज भरला आहे. नगरसेवकपदासाठी १० नोव्हेंबरपासून आजअखेर रत्नागिरीत ४४ अर्ज दाखल झाले. त्यात शिवसेनेचे (शिंदे) सर्वाधिक १३ अर्ज आहेत. त्यापाठोपाठ अपक्ष म्हणून ११ जणांनी अर्ज भरले असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटानेही ५ अर्ज भरले. “आप”कडून ६ जणांनी अर्ज भरत राजकीय पटलावर उडी घेतली आहे.

शिवसेनेकडून आज अस्मिता सुशील चवंडे (१५ अ), मैथिली मयेकर (१२ अ), अनिकेत अनिल वालम (१ ब), सायमा नदाफ काझी ( ४ अ), मंजुळा विजय कदम (५ ब), सरिता जितेंद्र कदम (५ ब), कामना अरुण बेग (९ ब) यांनी अर्ज भरले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून प्रसाद सुरेश सावंत (३ ब), राजश्री बिपीन शिवलकर (१५ अ), साजीदखान अकबरखान पावसकर (८ ब), अमित वसंत विलणकर (१५ ब), नाझनीन युसुफ हकीम (९ ब) यांनी अर्ज भरले आहेत. उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे महायुती व आघाडीतील उमेदवारी न मिळालले नाराज उमेदवार अपक्ष म्हणून अर्ज भरण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे उद्या शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करणाऱ्यांची भाऊ गर्दी उसळणार आहे




