
दिल्लीनंतर आता जम्मू-काश्मीरच्या नौगाम पोलीस ठाण्यात मोठा स्फोट; ९ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
श्रीनगरच्या नागौम पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री मोठा स्फोट होऊन त्यात ९ जणांचा मृत्यू तर २९ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. सोमवारी (१० नोव्हेंबर) दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ गाडीत स्फोट झाल्यानंतर तपास यंत्रणांनी या स्फोटाशी निगडित दहशतवादी मॉड्यूल उध्वस्त करण्यासाठी देशभरात अनेक ठिकाणी धाडी टाकल्या. याच मॉड्यूलशी संबंधित जप्त करण्यात आलेली स्फोटके पोलीस ठाण्यात ठेवण्यात आली होती.
द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, स्फोटाचा आवाज ३० किमीपर्यंत ऐकू गेला होता, इतकी स्फोटाची तीव्रता होती. स्फोटानंतर पोलीस ठाण्याचा परिसरातील अनेक वाहनांना आग लागली. मध्यरात्री झालेल्या या भीषण स्फोटानंतर रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्य सुरू केले.
या स्फोटाची भीषणता एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. स्फोटाच्या तीव्रतेमुळे आसपासच्या घराच्या खिडक्या, दरवाजे जोरात आदळल्याचे व्हिडीओत दिसत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित स्फोटके पोलीस ठाण्यात ठेवण्यात आली होती. या स्फोटकांची तपासणी करत असताना हा स्फोट झाला. फॉरेन्सिक टीम, तहसीलदार आणि पोलीस कर्मचारी स्फोटके हाताळत असताना त्याचा स्फोट झाला.
जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असलेल्या आंतरराज्यीय दहशतवादी मॉड्यूलचा तपास करताना नौगाम पोलीस ठाणे केंद्रस्थानी आले होते. ऑक्टोबर महिन्यात जैश-ए-मोहम्मदशी संबंधित काही पोस्टर्स परिसरात झळकल्यानंतर नागौम पोलीस ठाणे चर्चेत आले होते. सुरुवातीला हा विषय स्थानिक असल्याचे वाटले मात्र पुढे या आंतरराज्यीय मॉड्यूलचा भांडाफोड झाला.
आरोपी डॉक्टरच्या निवासस्थानी धाड टाकल्यानंतर पोलिसांनी ३५० किलोपेक्षा अधिक अमोनियम नायट्रेट जप्त केले होते. २,९०० किलोच्या संशयित स्फोटकाचा हा भाग असू शकतो, असा संशय व्यक्त करण्यात आला. ज्यामध्ये पोटॅश, फॉस्फरस, इतर ज्वलनशील पदार्थ, इलेक्ट्रॉनिक सर्किट, बॅटरी, वायर, रिमोट कंट्रोल, टायमर आणि पत्र्याचा समावेश होता. या स्फोटकापैकी नागौम पोलीस ठाण्यात किती स्फोटके ठेवली गेली, याबद्दलची माहिती पोलिसांनी उघड केलेली नाही.




