
बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीए सत्तेवर येण्याचा मार्ग मोकळा एनडीएला जवळपास 200 जागा, संजय राऊत यांचा संताप
बिहार विधानसभेच्या 243जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत समोर आलेल्या निकालानुसार, बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीए सत्तेवर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.एनडीएला जवळपास 200 जागा मिळताना दिसत आहेत. भाजपाला 90, जेडीयूला 80, लोकजनशक्ती पार्टीला 20 तर आरजेडीला 209 आणि काँग्रेसला 5 जागा मिळत असल्याचं सध्याचं चित्र आहे. महागठबंधन 50 जागांचाही आकडा पार करु शकलेलं नाही. शिवसेना खासदार संजय राऊतांनी या निकालाची तुलना महाराष्ट्राशी केली आहे.
बिहारमधील निकालावर संजय राऊतांनी एक्सवरुन पोस्ट शेअर करत टीका केली आहे. “बिहारच्या विधानसभा निवडणुका निकालाने धक्का बसण्याची गरज नाही. निवडणूक आयोग आणि भाजपा यांचे हातात हात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होते ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते! एकदम महाराष्ट्र पॅटर्न! जी आघाडी सत्तेवर येणार याची खात्री होती त्याना ५० च्या आत संपवले”, असा संताप संजय राऊतांनी व्यक्त केला आहे.
बिहारच्या जनतेने दिला कौल लावला निकाल.. ..झुट को “उखाड दिया!!” “व्होट चोरी”च्या अफवेचे दुकान ज्यांचे होते जोरात, दिल्लीसह “महाराष्ट्राचे पप्पू” आता कोमात !! आता कसं वाटंतय पप्पू के पप्पा ?,” अशी पोस्ट करत भाजपा नेते आशिष शेलार यांनी विरोधकांना डिवचलं आहे.
“व्होटचोरी…ईव्हीएम… दुबार मतदार..अशा अफवा पसरवून सफेद झुट बोलणाऱ्या दिल्लीच्या पप्पूला जनतेने धडा शिकवलाच. आता महाराष्ट्र आणि मुंबईतील जनता ही यांचा लवकरच “निकाल” लावेलच !! मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देशभरातील जनतेचा प्रचंड विश्वास!एनडीएला निर्विवाद यश देणाऱ्या बिहारच्या जनतेचे आभार. या यशासाठी परिश्रम घेणाऱ्या पक्षश्रेष्ठी, नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांचे ही मनापासून अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन !!,” असंही त्यांनी म्हटलं आहे.




