नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही; राज्य निवडणूक आयोगाचा दिलासा!


नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर उमेदवारांनी फक्त नामनिर्देशनपत्र व शपथपत्रातीलच माहिती भरावी. त्यासोबत कोणतेही कागदपत्रे सादर (अपलोड) करण्याची आवश्यकता नाही. संकेतस्थळावर संपूर्ण माहिती भरलेल्या नामनिर्देशनपत्राची आणि शपथपत्राची छापील प्रत घेवून व त्यावर सही करून आवश्यक कागदपत्रांसह तो संपूर्ण संच संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे विहित मुदतीत जमा करावी असा दिलासा राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी दिला. आयोगाच्या या निर्णयामुळे इच्छूक उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशपत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवांराचे अर्ज ऑनलाईन भरण्याची प्रक्रिया किटकट असून ऑनलाईन अर्ज भरतांना अडचणीत येत असल्याचे सांगत ही प्रक्रिया ऑफलाईन करण्याची मागणी काँग्रेसह विरोधी पक्षांनी केली होती.

काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत आयोगास पत्र पाठवून उमेदवारांचा अर्ज २० पानी असून त्यात आयोगाकडे उपलब्ध असणाराही माहिती मागविण्यात आली आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया किटकट असून त्यात सुधारणा करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली होती. त्याची दखल घेत आयोगाने आपल्या प्रक्रियेत सुधारणा केली आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने https://mahasecelec.in हे संकेतस्थळ विकसित केले आहे. त्यावर नोंदणी करून नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना नामनिर्देशनपत्र आणि शपथपत्रातील माहिती भरणे आवश्यक आहे. परिपूर्ण माहिती भरल्यानंतर संकेतस्थळावरून त्याची मुद्रित प्रत काढून त्यावर उमेदवाराची स्वत:ची व सूचकांची स्वाक्षरी करणे आवश्यक आहे.

त्यानंतर त्या मूळ प्रतीसह अन्य आवश्यक कागदपत्रांचा (उदा. नगरपरिषद/ नगरपंचायतीचे नादेय प्रमाणपत्र, शौचालय वापराबाबतचे प्रमाणपत्र किंवा स्वयंघोषणापत्र, निवडणुकीसाठी बॅंक खात्याचा तपशील, राखीव जागांवरील उमेदवार असल्यास जातप्रमाणपत्र, पक्षाचा उमेदवार असल्यास ‘जोडपत्र- १’ किंवा ‘जोडपत्र- २’ इत्यादी) संपूर्ण संच विहित मुदतीत संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे दाखल करणे बंधनकारक असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

इच्छूक उमेदवारांना नोंदणीसाठी सुरुवातीपासून सुरू केलेले संकेतस्थळ १७ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजेपर्यंत २४ तास सुरू असेल. तोपर्यंत त्यावर इच्छूक उमेदवारांना कोणत्याही वेळी नोंदणी करता येते व नोंदणी करताना तयार केलेला लॉगीन आयडी व पासवर्ड आपल्याकडे जपून ठेवावा लागतो. कारण नामनिर्देशनपत्र आणि शपथपत्रातील माहिती भरण्यासाठी ते आवश्यक असते. सही केलेल्या प्रिंटआऊटसह आवश्यक त्या संपूर्ण कागदपत्रांचा संच संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला विहित मुदतीत म्हणजे १७ नोव्हेंबर पर्यंत दुपारी ३ वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक आहे.

सर्व कागदपत्रांसह नामनिर्देशनपत्र शनिवार १५ नोव्हेंबर रोजी सुटीच्या दिवशीसुद्धा स्वीकारण्यात यावेत, अशा सूचना सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र रविवारी ते स्वीकारण्यात येणार नाहीत. इच्छूक उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्याचेही निर्देश सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींना देण्यात आले आहेत, असे राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button