
संगमेश्वर मोबाईल शॉपी फोडणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मध्यंतरी दुकान फोडीच्या व घरफोडीच्या घटना घडल्या होत्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत संगमेश्वर येथील दत्तकृपा मोबाईल शॉपीमधील चोरीच्या गुन्ह्यातील सराईत आरोपीला ठाणे जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. सदर आरोपी कडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, आरोपी सराईत गुन्हेगार असून तसेच त्याच्यावर यापूर्वी रायगड व ठाणे जिल्ह्यांमध्ये तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
दिनांक ०८ ऑक्टोबर २०२५ ते ०९ ऑक्टोबर २०२५ दरम्यान राजेश तुकाराम आंबवकर यांच्या संगमेश्वर एस.टी. स्टँडजवळील ‘दत्त कृपा मोबाइल शॉपी’ या दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने चोरी केली होती. चोरट्याने दुकानातील तीन मोबाईल, एक जीओचा राऊटर, एक पॉवर बँक, एक ब्ल्यूटुथ हेडफोन आणि एक स्मार्ट वॉच असा एकूण ₹ ५१,४९९/- किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता.
मा. पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांच्या सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांनी तात्काळ तपास पथक तयार केले. या पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास केला असता, सदर गुन्हा शंकर पाटील उर्फ शंकर साळुंखे, रा. कर्जत, जिल्हा रायगड याने केल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली. तो सध्या शहापूर, जि. ठाणे येथे असल्याची खात्री झाल्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक शहापूर व मुरबाड, जि. ठाणे येथे आरोपीच्या शोधासाठी रवाना झाले.
या पथकाने आरोपी नामे शंकर अर्जुन साळुंखे उर्फ शंकर अर्जुन पाटील, वय २३ वर्षे, रा. गणपती मंदिरा शेजारी, गुंडगे, ता. कर्जत, जि. रायगड यास दिनांक ११ नोव्हेंबर २०२५ रोजी ताब्यात घेतले. त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या ₹ १८,९९९/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपी शंकर अर्जुन साळुंखे उर्फ शंकर अर्जुन पाटील याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीमध्ये त्याने सुमारे १ महिन्यापूर्वी राजापूर येथून एक स्प्लेंडर मोटारसायकल चोरल्याची कबुली देखील दिली आहे. अटकेत असलेल्या या आरोपीवर रायगड व ठाणे अशा दोन जिल्ह्यांमध्ये यापूर्वी चोरी व घरफोडीसारखे एकूण तीन गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.
आरोपीला मा. न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यास चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास संगमेश्वर पोलीस ठाणे करत आहे. ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखालील पो. हेक विजय आंबेकर, पो. हेकॉ/ विवेक रसाळ, पो. हेकॉ/ दिपराज पाटील, आणि चा. पो. कॉ/ अतुल कांबळे यांनी पार पाडली आहे.




