
रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीत रक्ताची तीव्र टंचाई;रक्तदात्यांना पुढे येण्याचे आवाहन
*रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीतील रक्तसाठा धोक्याच्या पातळीवर आला आहे. रुग्णसंख्या वाढल्याने रक्ताची मागणी झपाट्याने वाढली असून सध्या रक्तपेढीला तीव्र टंचाई भासू लागली आहे.
दरवर्षी या रक्तपेढीतून सुमारे पाच हजार रक्ताच्या पिशव्यांचे संकलन केले जात होते. मात्र, शासनाने सर्व घटकांसाठी मोफत उपचार सुरू केल्याने आता मोफत पुरवठ्यासाठीच पाच हजार बॅगा लागतात. वाढत्या मागणीमुळे रक्तपेढीवर मोठा ताण आला आहे.
थॅलेसेमिया, ॲनेमिया, अपघातग्रस्त, कर्करोग, डायलिसिस, शस्त्रक्रिया, सिझर, तसेच माजी सैनिक अशा अनेक रुग्णांना दररोज मोफत रक्तपुरवठा केला जातो. जिल्हा शासकीय रुग्णालयासह इतर सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्या वाढल्याने रक्ताची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.
सध्या रक्तपेढीतून दिवसाला सरासरी ४० ते ४५ रक्ताच्या पिशव्यांचा पुरवठा केला जातो. मागणी वाढल्याने रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी वर्षभरात १४० ते १५० रक्तदान शिबिरांचे आयोजन करून सुमारे सात हजार बॅगा संकलित कराव्या लागतात.
रक्तदाते, सामाजिक संस्था व विविध संघटनांच्या सहकार्यामुळे रक्तसंकलन सुरू असले तरी सध्या परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे रक्तपेढीच्या वतीने सर्व नागरिकांना तसेच सामाजिक संस्थांना रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रक्तपेढी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे दररोज सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत रक्तदान करता येते.
“सद्य:स्थितीत अत्यंत गंभीर रुग्णांसाठी रक्ताची तातडीने गरज आहे. नागरिकांनी व संस्थांनी शिबिरे आयोजित करून सहकार्य करावे,” असे डाॅ. अर्जुन सुतार, जिल्हा संक्रमण अधिकारी, जिल्हा शासकीय रक्तपेढी, रत्नागिरी यांनी सांगितले.
.




