
महाराष्ट्र गारठला! तापमान घसरल्याने राज्यभर हुडहुडी
राज्यात मागील काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढत असून तापमानात सातत्याने घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईसह कोकणातही निरभ्र आकाश व गुलाबी थंडीचा अनुभव येत आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये आधीच कमी तापमान नोंदवले गेले असताना तापमानाचा पारा आणखी खाली जाण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात आज आकाश प्रामुख्याने निरभ्र राहणार आहे. दिवसा उन्हाचा तडाखा जाणवेल, तर सकाळी आणि रात्री थंडीचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये थंडी आणखी वाढत असून, पुढील काही दिवसांत तापमान आणखी खाली जाऊ शकते.
मुंबई आणि कोकण विभागात आज 12 नोव्हेंबर रोजी आकाश निरभ्र राहील. मुंबईत कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान सुमारे 21 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्येही कोरडे आणि उबदार वातावरण कायम राहील. राज्याच्या कमाल तापमानात हळूहळू घट होत आहे. काल सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये डहाणू येथे 32.9 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. धुळे येथील कृषी महाविद्यालय येथे राज्याचे नीचांकी 8.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. जळगाव, निफाड येथे थंडीची लाट कायम असून मुंबई, ठाणे, पालघर, कोकण, रत्नागिरी, नाशिक, परभणी, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये गुलाबी थंडी अनुभवण्यास मिळत आहे.




