
विक्रांत जाधवांना विकासावर बोलण्याचा सल्ला
निराधार आरोपांवर गृहराज्यमंत्री योगेश कदमांची टीका
चिपळूण : “भास्कर जाधव हे विधिमंडळातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या मुलांनी अशा प्रकारची वक्तव्ये करणे योग्य नाही. विक्रांत जाधव यांनी विकासावर बोलावे. स्वतःची बदनामी करून घेतली, आता दुसऱ्याची बदनामी करण्यात समाधान मानू नये,” असा खोचक सल्ला राज्याचे गृहराज्यमंत्री तथा मंडणगड-दापोली-खेड मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी विक्रांत जाधव यांना दिला.
महायुतीच्या बैठकीनिमित्त अभिषेक हॉटेल येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कदम म्हणाले, “विक्रांत जाधव यांनी केलेले सर्व आरोप निराधार आहेत. पोलीस आपले काम स्वतंत्रपणे करत आहेत. कोणतीही नावे वगळण्याबाबत निर्देश दिलेले नाहीत. या प्रकरणाचे सत्य लवकरच समोर येईल.”
खेड नगराध्यक्ष पदाच्या संभाव्य उमेदवारीविषयी बोलताना ते म्हटले, “वैभव खेडेकर यांनी उमेदवार असल्याचा स्टेटस ठेवला आहे. कोण काय स्टेटस ठेवतो, हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. महायुती योग्य वेळी निर्णय जाहीर करेल. वैभव खेडेकर हे महायुतीत आहे, म्हणून सध्या त्यांच्यावर काही भाष्य करणार नाही.”
खेड शहरातील मुख्य रस्त्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
या वेळी शशिकांत चव्हाण, उमेश सकपाळ, संदेश आयरे, सुयोग चव्हाण, निहार कोवळे आदी उपस्थित होते.




