
मांडवी येथे एका तरुणावर मद्यधुंद हल्लेखोराने कोयत्याने केले वार, तरुण गंभीर जखमी आरोपीला अटक
रत्नागिरी शहरातील शांततेला तडा देणारी आणि थरकाप उडवणारी एक अत्यंत गंभीर घटना आज सायंकाळी मांडवी येथील भुतेनाका परिसरात घडली आहे. भररस्त्यात दुचाकीवरून जाणाऱ्या एका तरुणावर मद्यधुंद हल्लेखोराने कोयत्याने सपासप वार केले. अरमान इनामदार (रा. मिरकरवाडा, रत्नागिरी) असे जखमी तरुणाचे नाव असून अंकुश मांडवकर (रा. मांडवी, रत्नागिरी) असे हल्लेखोराचे नाव आहे.या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला तरुण जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. गजबजलेल्या ठिकाणी अचानक घडलेल्या या रक्तरंजित प्रकारामुळे संपूर्ण रत्नागिरी शहरात भीती आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, शहर पोलिसांना ही घटना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत अंकुश मांडवकर याला ताब्यात घेतले आहे.घडलेल्या घटनेनुसार, आज सायंकाळी भुतेनाका रस्त्यावर एक मद्यप्राशन केलेला अंकुश मांडवकर हा हातात कोयता घेऊन फिरत होता आणि येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना धमकावत होता. याच वेळी बस स्थानकाकडून मांडवीच्या दिशेने आपल्या दुचाकीवरून जाणाऱ्या अरमान इनामदार या तरुणाला त्याने लक्ष्य केले. या मांडवकरने कोणताही विचार न करता त्याच्यावर कोयत्याने एकामागोमाग एक वार केले. यामुळे तो जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात पडला.या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी शहर पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अचानक घडलेल्या या हल्ल्यामुळे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी कोणताही तणाव निर्माण होऊ नये यासाठी तात्काळ परिसर बंदोबस्तात घेतला. जखमी तरुणाला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.मांडवीसारख्या गजबजलेल्या ठिकाणी, सायंकाळी भररस्त्यात हा हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. या घटनेबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.




