
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीतील पर्यटक बनून आलेल्या तिघांनी वृद्ध महिलेकडील मंगळसूत्र ओढून काढला पळ,संशयित बारा तासात गजाआड
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीतील नांगरतास येथे चारचाकीतून पर्यटक बनून आलेल्या तिघांनी वृद्ध महिलेकडे पिण्याचे पाणी मागण्याचा बहाणा करून मंगळसूत्र हिसकावले; पण निम्माच ऐवज ताब्यात आल्याने तो तसाच घेऊन आंबोलीच्या दिशेने पळ काढला.महिलेच्या तक्रारीनंतर सिंधुदुर्ग पोलिसांनी हुपरी (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथून सर्व तिघाही संशयितांना बारा तासात गजाआड केले.
अकबर साहेबजी दरवेशी (24, रा. शाहूनगर रेंदाळ, ता. हातकणंगले), चंद्रकांत प्रभाकर गायकवाड (34, रा. बिरदेव रेंदाळ, ता. हातकणंगले), राकेश विजय कंगणे (34, रा. शाहूनगर, हुपरी, ता. हातकणंगले) अशी त्यांची नावे असून, या तिघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
दरम्यान, गुन्ह्यात वापरलेली इर्टिगा गाडी व चोरलेले सोने व ते खरेदी करणार्या सराफांलाही लवकरच ताब्यात घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बुधवार (दि. 5) रोजी आंबोली – आजरा या मार्गावरील नांगरतासवाडी येथे मायकल डिसोजा यांच्या फार्म हाऊस व उसाच्या शेतीत काम करणार्या सुहासिनी राऊत या नेहमी प्रमाणे शेतात काम करत होत्या. सकाळी 10.30 च्या सुमारास आंबोलीच्या दिशेकडून आजर्याकडे जाणारी पांढर्या रंगाची इर्टिगा गाडी सदर फार्म हाऊसजवळ थांबली. गाडीत तिघेजण होते. त्यातील एकजण पाण्याची बॉटल घेऊन सौ. राऊत यांच्या जवळ आला अन् पिण्याचे पाणी थोडे देता का? अशी मागणी केली. सौ. राऊत यांनी लगतच्या नळाला लावलेल्या पाईपने बॉटलमध्ये पाणी भरून देऊ लागल्या; पण तेवड्यातच त्या व्यक्तीने सौ. राऊत यांच्या गळ्यातील सोन्याच्या 2 डवल्या, 4 मोठे मनी व 30 लहान मनी तसेच बारीक काळे मनी असलेले एक तोळ्याचे मंगळसुत्र हिसकावले. त्यावेळी झालेल्या झटापटीत सौ. राऊत यांच्या मंगळसुत्राचा काही भाग तुटुन खाली पडला व मुख्य काही भाग सदर व्यक्ती घेवून पळून गाडीत गेला होता. त्यानंतर तीन्ही अज्ञात व्यक्ती त्याच गाडीने आजरा (जि. कोल्हापुर) दिशेने निघुन गेले.
सौ. राऊत यांनी आंबोली पोलिसांना सदर घटनेची अज्ञात चोरट्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती




