
ट्रक मालकांची आर्थिक फसवणूक;बाळ माने यांच्या ‘यश ट्रान्सपोर्ट’वर गंभीर आरोप
_____* जयगड परिसरातील ट्रक मालकांनी ‘यश ट्रान्सपोर्ट’चे मालक व माजी आमदार बाळ माने यांच्याकडे २०१३ पासूनची सुमारे दीड कोटी रुपये रक्कम थकित असल्याचा आरोप कायम ठेवला आहे. थकित रक्कम न मिळाल्यामुळे अनेक ट्रक मालक कर्जबाजारी झाले असून बँकांनी जप्ती कारवाई केल्याचे ट्रक मालकांनी सांगितले. याबाबत जयगड येथील लॉरी असोसिएशनच्या सदस्यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
ट्रक मालकांनी सांगितले की, बाळ माने यांनी देयकाची परतफेड करण्यासाठी प्रत्येकी १ लाख रुपयांचे धनादेश दिले होते, मात्र ते धनादेश बाऊन्स झाले. त्यानंतर वारंवार पाठपुरावा करूनही पैसे देण्यात आले नाहीत. पैसे देण्याबाबत ‘आज देतो, उद्या देतो’ अशी आश्वासने दिली गेली, परंतु प्रत्यक्ष रक्कम न दिल्यामुळे ४०० पैकी ३०० पेक्षा जास्त ट्रक बँकांनी जप्त करून ओढून नेले, असेही ट्रक मालकांनी स्पष्ट केले.
यामुळे अनेक कुटुंबांवर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कर्ज फेडण्यासाठी पर्यायी मार्ग नसल्याने व्यवसाय बंद होण्याच्या परिस्थितीला अनेकांना सामोरे जावे लागले आहे. असोसिएशनच्या सदस्यांनी या प्रकरणात शासनाने व प्रशासनाने हस्तक्षेप करून ट्रक मालकांना न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.
या पत्रकार परिषदेला योगेंद्र कल्याणकर, अनिरुद्ध साळवी, आदेश पाखरे, विकी सावंत, प्रमोद घाटगे, अनिस मिरकर, शराफत गडबडे, अजिम चिकटे, शरद चव्हाण, आदेश पावरी, दीपक पाटील, राजेश पाटील, उदय शिर्के, विनय चव्हाण, अनिल केदारी, रवींद्र केदारी, मुदस्सर ठाकूर व गिरीष महाडिक यांसह अनेक ट्रक मालक उपस्थित होते.




