
गुहागर नगराध्यक्षपदासाठी ठाकरे सेनेच्या सौ. पारिजात कांबळे यांच्या नावाची चर्चा
गुहागर नगरपंचायत निवडणुकीत गुहागर शहरात रंगत येणार असून गेली दहा वर्ष गुहागर तालुक्यातील महिलांचे सबलीकरण तसेच महिलांना व्यवसाय, उद्योग व नोकरी देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या, उच्चशिक्षित आणि सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून सौ. पारिजात कांबळे यांच्या नावाची राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा चालू आहे.
याबाबत सौ. कांबळे यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या, “मी मूळ शिवसेनेची पदाधिकारी आहे. पक्ष जो आदेश देईल तो आदेश मला मान्य राहील. जनतेने स्वीकारणे व निवडून देणे हे त्यांचे काम आहे. पक्षाने मला संधी दिली, तर सर्वांना सोबत घेऊन गुहागर शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. या आधीही नगरसेविका पदाची निवडणूक मी लढवली होती; मात्र अवघ्या दोन मताने पराभव झाला. आत्ता महिला नगराध्यक्ष पदाची संधी आहे. जनतेने मनापासून कौल दिला, तर शहराचा विकासात्मक कायापालट नक्कीच करेन व सर्व समावेशक कार्य करेन,”
सामाजिक, धार्मिक कार्यात तसेच सर्वसामान्य जनतेसाठी अहोरात्र मेहनत घेऊन मदत करणाऱ्या सौ. कांबळे यांना ठाकरे शिवसेनेकडून संधी दिली जाईल का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.




