
अर्थपूर्ण राष्ट्रीय गीत वंदे मातरम् भारतीयांसाठी प्रेरणादायी
संचालक डॉ. दिनकर मराठे यांचे गौरवोद्गार... रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रात वंदे मातरम् गीताचे सामूहिक गायन...

वंदे मातरम् हे गीत अत्यंत अर्थपूर्ण गीत असून स्वातंत्र्याच्या समयी अनेकांसाठी स्फूर्तीदायी गीत ठरले. आजही या गीतातील शब्द थेट मनाला भिडतात. यातील बहुतांश शब्द संस्कृत भाषेत असून उर्वरित शब्द बंगाली भाषेत आहेत. असे भारताचे स्तुत्य वर्णन करणारे अर्थपूर्ण राष्ट्रीय गीत वंदे मातरम् भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे असे गौरवोद्गार रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी काढले.
ते रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
दरम्यान बंकिमचंद्र चट्टोपाध्याय रचित भारताचे राष्ट्रीय गीत असलेल्या “वंदे मातरम्” या गीताला दि. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्षे पूर्ण झाली. याचे औचित्य साधून कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ.पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्र येथे आज सकाळी ११.३० वाजता भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम् गीताचे सामुहिक सुस्वर गायन करण्यात आले. यावेळी रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी वंदे मातरम् या गीतामागील इतिहास उलगडला. यावेळी रत्नागिरी उपकेंद्रातील विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.




