
वर्षभरात चांगला परफॉर्मन्स दाखवणार नाहीत त्या नगरसेवकांचा राजीनामा घेणार : पालकमंत्री ना. उदय सामंत यांचा इशारा
- जे नगरसेवक निवडून येतील आणि एक वर्ष परफॉर्मन्स तुम्हाला दाखवणार नाहीत त्यांना दुसऱ्या वर्षी घरी पाठवण्याची जबाबदारी या निवडणुकीच्या निमित्ताने मी स्वतः घेतलेली आहे. एक वर्षात जर नगरसेवकाने काम केलं नाही, त्या नगरसेवकांने राजीनामा द्यायचा. मला पोटनिवडणूक लागली तरी चालेल. ती पोटनिवडणूक आपण लढू पण, अकार्यक्षम नगरसेवकाला रत्नागिरी शहरांमध्ये, आमच्या पक्षामार्फत, आमच्या महायुतीमार्फत थारा दिला जाणार नाही, असा इशारा राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ना. डॉ. उदय सामंत यांनी येथे दिला.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, शेवटी बांधिलकी ही आमची तुमच्याशी आहोत आणि जे नगरसेवक वागतात, जे नगरसेवक ज्या पद्धतीने संघटना बांधतात किंवा ज्या पद्धतीने विकासाची काम करतात त्याचे सगळे परिणाम आमच्यासारख्या कार्यकर्त्याला भोगायला लागतात. *त्यामुळे व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींनी आपण एक वर्षांमध्ये किती चांगला परफॉर्मन्स दाखवणार आहोत. आम्ही एक वर्षांमध्ये रत्नागिरीकरांच्या विश्वासाला किती पात्र ठरणार आहोत हे सगळं कॅल्क्युलेशन करूनच निवडणुका लढवल्या पाहिजेत आणि हा दिलेला शब्द आम्ही रत्नागिरीकर यांच्या शेकडो लोकांच्या समोर देतो जर तुमच्या प्रभागातल्या दोन नगरसेवकांनी तुम्हाला अपेक्षित काम केलं नाही तर अशाच गर्दी तुम्ही येऊन सांगा. तुम्ही जी मागणी केलेली होती नगरसेवकांना मत द्यायची ती आम्ही दिल्यानंतर तुमचा नगरसेवक काम करत नाही, अशा नगरसेवकाचा राजीनामा घेतल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही हा देखील शब्द प्रचाराच्या सुरुवातीला देतो, असे ना. सामंत यांनी स्पष्ट केले.
रत्नागिरी नगर परिषद प्रभाग क्रमांक पाचमध्ये आयोजित संपर्क मेळाव्यात ना. सामंत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख राहुल पंडित, राजेंद्र महाडिक, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, जेष्ठ नेते राजन शेट्ये, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, स्मितल पावसकर, पूजा पवार, दीपक पवार, सौरभ मलुष्ट्ये, भाजपचे सचिन वहाळकर, वैभवी खेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
ना. उदय सामंत पुढे म्हणाले की, मुंबई येथे महायुती करण्यासंदर्भात बैठक झाली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपाचे प्रवेश प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मी स्वतः त्या बैठकीला उपस्थित होतो. जिल्ह्याचे दुसरे मंत्री योगेश कदम देखील उपस्थित होते. *आज संकष्टी आहे, दिवस देखील चांगला आहे. मी आज लिहून देतो की, या नगरपालिकेवर महायुतीचा नगराध्यक्ष होणार आहे. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण असेल त्याचं नाव काय असेल हे जे काही युतीमध्ये ठरलेल्या त्या पद्धतीने जाहीर होईल. पण मला अख्या महाराष्ट्रामध्ये फिरायचं असल्यामुळे महाराष्ट्रात सगळ्यात पहिल्यांदा प्रचाराला सुरुवात जर कुठे होत असेल तरी रत्नागिरी मध्ये होत आहे आणि तीदेखील संकष्टीच्या दिवशी होते, याचा मला आनंद आहे.
यावेळी बोलताना ना. उदय सामंत म्हणाले की, विकासावर चर्चा करत असताना रत्नागिरीमध्ये किती विकास झालाय, किती कोटीचा विकास झालाय, किती कोटीचा विकास होणार आहे, त्याच्यावर आपण चर्चा करतो. आपल्याकडे शिवसृष्टी झाली त्याच्यावर आपण चर्चा करतो. आपल्याकडे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने जे नाट्यगृह उभारले आहे ते महाराष्ट्रातलं चांगलं नाट्यगृह म्हणून आपण चर्चा करतो. महाराष्ट्रातला अतिशय देखणे असे लोकमान्य टिळकांचे स्मारक आपण उभं केलं त्याच्यावर आपण चर्चा करतो आणि देशातला पहिला थ्रीडी मल्टिमीडिया शोदेखील रत्नागिरी शहरांमध्ये केला त्याच्यावर आपण चर्चा करतो. पण नागरिकांचे लक्ष रस्त्यावर, रस्ते कधी चांगले होणार आहेत. त्याला खड्डे पडलेले आहेत. तसेच चांगल्या कामाचं श्रेय माझ्यासारखा कार्यकर्ता घेतो, त्याप्रमाणे जे काम राहिले आहे त्याचीदेखील जबाबदारी मी दुसऱ्या कोणावर ढकलणार नाही ते माझ्यावरच घेणार आहे. त्यामुळे *पुढच्या दोन महिन्यांमध्ये एकही खड्डा रत्नागिरी शहरांमध्ये राहणार नाही हे देखील पालकमंत्री म्हणून मी आपल्याला आश्वाशीत करत आहे
ज्यांचं राजकीय अस्तित्व संपले आहे ते टिकवण्यासाठी काही लोक धडपड करत असतात. त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करायचं. रत्नागिरी माझ्यावर टीका व्हायला सुरुवात होते त्यावेळी आपण समजून जायचं की, रत्नागिरी नगरपालिका, रत्नागिरी जिल्हा परिषद, रत्नागिरीची खासदारकी किंवा रत्नागिरीची आमदारकी याची कुठली तरी निवडणूक लागली आहे. त्यामुळे त्यांच्यावर बोलून त्यांना मला मोठे करायचं नाही. निवडणूक आली की ही मंडळी पाच वर्षानंतर उगवतात. पाच वर्ष कुठे असतात, काय करतात उदय सामंतांकडे कडे कामाला किती येतात, हेदेखील पाहण्याची आवश्यकता आहे, असे ना. सामंत म्हणाले.
यावेळी जिल्हाप्रमुख राहुल पंडित, भाजपचे सचिन वहाळकर यांनी आपले विचार मांडले. शेवटी प्रभाग क्रमांक पाच मधील सौरभ मलुष्ट्ये यांनी सर्वांचे आभार मानले.




