रत्नागिरीत आंबेडकरी पक्षांची एकजूट; स्थानिक स्वराज्य निवडणुकीत ‘बहुजन शक्ती’ उतरविण्याचा निर्धार

रत्नागिरी /

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये रत्नागिरी तालुक्यात आंबेडकरी पक्षांनी एकत्र येत ताकदीनिशी निवडणूक लढविण्याचा निश्चय केला आहे. काल रत्नागिरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे पार पडलेल्या संयुक्त बैठकीत बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) आणि भीम आर्मी या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकमुखी निर्णय घेतला.

ही बैठक थिबाराजाकालीन बुद्धविहार संघर्ष समितीचे अध्यक्ष आयु. एल. व्ही. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. संघर्ष समितीच्या पुढाकाराने २७ ऑक्टोबर रोजी तालुकास्तरावर काढण्यात आलेला बुद्धविहारासाठीचा मोर्चा यशस्वी ठरला होता. त्या आंदोलनातून निर्माण झालेल्या ऐक्याच्या भावनेला आता राजकीय रूप मिळत असून, आंबेडकरी समाजाने स्थानिक निवडणुकांत स्वतःची ताकद दाखविण्याचा निर्धार केला आहे.

बैठकीत वक्त्यांनी स्पष्ट केले की, बहुजन समाजावर केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यातील महायुती सरकारकडून सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्तरावर अन्याय होत आहे. या अन्यायाचा बदला ‘मतपेटीतून’ देण्याची वेळ आली असल्याचे सर्वांनी ठामपणे मांडले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये स्वतःचे स्वतंत्र उमेदवार उतरवून निवडणूक लढविण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. तसेच, निवडणुकीसाठी एक संयुक्त कोअर कमिटी स्थापन करून रणनिती आखण्याचे ठरवण्यात आले आहे.

या बैठकीस बहुजन समाज पार्टीचे राजेश सावंत (रत्नागिरी विधानसभा अध्यक्ष), अनिकेत पवार (जिल्हा प्रभारी), रुपेश कांबळे (शहराध्यक्ष) यांसह वंचित बहुजन आघाडीचे मुकुंद सावंत (जिल्हा माजी महासचिव), राजेंद्र कांबळे (तालुका अध्यक्ष), बिपीन आयरे (महासचिव), तर आरपीआय (गवई) कडून राजन जाधव (तालुका अध्यक्ष) व भीम आर्मीचे प्रदीप पवार हे उपस्थित होते. या ऐतिहासिक एकत्रीकरणामुळे आंबेडकरी समाजात नवचैतन्य संचारले असून, स्थानिक राजकारणात ‘बहुजन एकतेचा नवा अध्याय’ सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button