
पाच दिवसांत १५०० किमी सायकलिंग
सावर्डेचा पृथ्वी पाटील ‘सुपर रँडोनिअर’
चिपळूण : ऑडेक्स इंडिया रँडोनिअर्स संलग्न सह्याद्री रँडोनिअर्स, चिपळूण यांच्या वतीने आयोजित पाच दिवसीय सुपर रँडोनिअर सिरीजमध्ये सहभागी होत सावर्डे (ता. चिपळूण) येथील पृथ्वी कृष्णकांत पाटील याने अवघ्या पाच दिवसांत सुपर रँडोनिअर हा किताब मिळवण्याचा उल्लेखनीय पराक्रम केला. हा किताब पटकावणारा पृथ्वी पाटील हा संपूर्ण कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पहिला सायकलपटू ठरला असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या स्पर्धेअंतर्गत २००, ३००, ४०० आणि ६०० किमी अंतर सायकलने ठराविक वेळमर्यादेत पूर्ण करावे लागते. या सर्व राईड्स पूर्णपणे सेल्फ सपोर्टेड असतात. साधारणपणे जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत या चारही बीआरएम पूर्ण केल्यानंतर रायडरला सुपर रँडोनिअर किताब दिला जातो; मात्र आव्हान अधिक कठीण करण्यासाठी सह्याद्री रँडोनिअर्सने सलग पाच दिवसांतच सर्व बीआरएमचे आयोजन केले होते. या परस्थितीत केवळ शारीरिक क्षमतेचा नव्हे तर मानसिक स्थैर्याचाही मोठा कस लागतो.
अवघ्या पाच दिवसांत १५०० किमी सायकल चालवत पृथ्वीने हे आव्हान यशस्वीपणे पार पाडले. या उल्लेखनीय यशानंतर समाजातील विविध स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पृथ्वी हा सावर्डे येथील प्रथितयश डॉ. कृष्णकांत पाटील आणि डॉ. सौ. दर्शना पाटील यांचा सुपुत्र असून तो चिपळूण सायकलिंग क्लबचा सक्रिय सदस्य आहे. चिपळूण येथे आगमन झाल्यानंतर क्लबच्या सदस्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला.
आपल्या पराक्रमाबद्दल पृथ्वी म्हणाला, “चिपळूण सायकलिंग क्लबच्या सर्व सदस्यांच्या सहकार्यामुळेच हे यश शक्य झाले.”
या राईड्स कराड–सोलापूर, कराड–नागज, कराड–बारामती–इंदापूर तसेच कराड–फलटण या मार्गांवर आयोजित करण्यात आल्या होत्या. सायकलपटूंची सुरक्षितता, आहार, तब्येत आणि मनोबल याकडे सह्याद्री रँडोनिअर्सचे प्रमुख मनोज भाटवडेकर यांनी विशेष लक्ष दिले. पृथ्वीने त्यांचेही मनःपूर्वक आभार मानले.
या यशानंतर चिपळूण-संगमेश्वर विधानसभा क्षेत्राचे आमदार शेखर निकम यांनी कराड येथे पृथ्वीचा विशेष सत्कार केला. या सन्मानाबद्दल पाटील कुटुंबीयांनी आमदार निकम सर, चिपळूण सायकलिंग क्लब आणि सह्याद्री रँडोनिअर्स यांचे आभार मानले.




