
संगमेश्वर तालुक्यातील मौजे राजवाडी येथे शिकारीच्या उद्देशाने फिरणाऱ्या टोळक्याला वनविभागाने ताब्यात घेतले ,बंदूक हस्तगत
रत्नागिरी वनविभागाच्या पथकाने संगमेश्वर तालुक्यात दिनांक ६ नोव्हेंबर २०२५ च्या रात्री केलेल्या एका मोठ्या कारवाईत शिकारीच्या उद्देशाने फिरणाऱ्या एका बोलेरो पिकअप वाहनातून बंदूक आणि जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या कारवाईत चार संशयित आरोपींना वनविभागाने ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ६ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री अंदाजे ११:३० वाजण्याच्या सुमारास वनविभागाचे गस्ती पथक संगमेश्वर तालुक्यातील मौजे राजवाडी येथील ब्राह्मणवाडी साईमंदिर समोर अणदेरी ते राजवाडी मार्गावर गस्त घालत होते.
यावेळी गस्ती पथकाला MH-०८ AP- ८६२१ क्रमांकाची एक बोलेरो पिकअप संशयास्पद स्थितीत दिसली. या वाहनाच्या टपावर बसून काही व्यक्ती हॅंड टॉर्चच्या प्रकाशाच्या साहाय्याने शिकारीच्या उद्देशाने लाईट फिरवत असल्याचे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. संशय बळावल्याने वनविभागाच्या पथकाने तात्काळ सदर वाहन थांबवून त्याची कसून झडती घेतली. या झडतीमध्ये वाहनात एकूण चार संशयित इसम, एक १२ बोअर बंदूक, सहा जिवंत काडतुसे आणि दोन हॅंड टॉर्च असा मुद्देमाल मिळून आला. वनविभागाने तात्काळ हा संपूर्ण मुद्देमाल वाहनासह जप्त करून सर्व संशयितांना पुढील चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या कारवाईत ताब्यात घेतलेल्या चार संशयित आरोपींची नावे विश्वनाथ शांताराम मालप (वय २९, रा. अणदेरी, ता. संगमेश्वर), गजानन मानसिंग इंदुलकर (वय ४३, रा. हेदली, ता. संगमेश्वर), रुपेश धोंडु पोमेंडकर (वय ४१, रा. कारभाटले, ता. संगमेश्वर) आणि राहुल रविंद्र गुरव (वय २८, रा. तिवरे घेरा प्रचितगड, ता. संगमेश्वर) अशी आहेत. या सर्व आरोपींविरुद्ध भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला




