
शिवसेना (शिंदे गट) युवासेना उपजिल्हाप्रमुख सचिन काते यांना मारहाण,आमदार भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल
खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी परिसरात स्थानिकांना रोजगार देण्याच्या मागणीवरून उद्भवलेल्या वादात शिवसेना (शिंदे गट) युवासेना उपजिल्हाप्रमुख सचिन काते यांना मारहाण झाली. या प्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रत्नागिरी जिल्हाप्रमुख व आमदार भास्कर जाधव यांचे सुपुत्र विक्रांत भास्कर जाधव यांच्यासह तिघांवर खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी सचिन काते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, विजय केमिकल कंपनीत स्थानिक युवकांना रोजगार देण्याची मागणी करत असताना अचानक वाद निर्माण झाला. त्यानंतर विक्रांत जाधव, सुमित शिंदे, विवेक आंब्रे व त्यांच्यासोबत आलेल्या आणखी ७-८ जणांनी काते यांच्यावर हल्ला करून मारहाण केली, असे तक्रारीत नमूद आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने लोटे परिसरात खळबळ उडाली आहे. खेड पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये नव्या संघर्षाची ठिणगी पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.




