रत्नागिरीतील दोन सोन्याच्या व्यापार्‍यांची कोल्हापूर येथील सोन्याच्या व्यापार्‍याकडून तब्बल 3 कोटी 2 लाख 66 हजार 930 रुपयांची फसवणूक


कोल्हापूर येथील सोन्याच्या व्यापार्‍याकडून रत्नागिरीतील दोन सोन्याच्या व्यापार्‍यांची तब्बल 3 कोटी 2 लाख 66 हजार 930 रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे.याप्रकरणी संबंधित व्यापार्‍याच्या मॅनेजरने कोल्हापूर येथील विनायक बंडूजी पोतदार आणि त्याच्या सहकार्‍याविरोधात शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

तक्रारीनुसार, रत्नागिरीतील राजेंद्र वसंत चव्हाण (रा. खेडेकर संकुल, झाडगाव, रत्नागिरी) हे रत्नागिरीतील अर्हम् गोल्ड आणि ए जी गोल्ड फर्म या दोन ठिकाणी मॅनेजर म्हणून का पाहतात. मुंबई व रत्नागिरी येथेदेखील त्यांचा सोन्याचा होलसेल व्यापार आहे. तक्रारदार चव्हाण यांनी कोल्हापूर येथील व्यापारी विनायक बंडूजी पोतदार याच्या माध्यमातून सोन्याचे व्यवहार केले. रत्नागिरीतील श्रीकृष्ण ज्वेलर्सचे मालक चंद्रकांत सागवेकर यांनी विनायक पोतदारसोबत ओळख करून दिल्याचे तक्रारदार चव्हाण यांचे म्हणणे आहे. 18 फेब्रुवारी 2025 आणि 1 मार्च 2025 रोजी झालेल्या सोन्याच्या व्यवहारासाठी तक्रारदार चव्हाण यांनी 22 कॅरेट सोन्याचे सुमारे 1 किलो 987 ग्रॅम इतक्या प्रमाणात सोन्याचे दागिने पोतदारला विकले होते.

या व्यवहाराची एकूण किंमत 1 कोटी 50 लाखांपेक्षा अधिक होती. याचप्रमाणे इतर बिलांद्वारेदेखील एकूण 3 कोटी 2 लाख 66 हजार 930 इतका आर्थिक व्यवहार झाला होता. मात्र, त्यातील रक्कम पोतदारकडून अदा करण्यात आली नाही. तक्रारदाराच्या नावाने दिलेले धनादेश नंतर पेमेंट स्टॉप बाय ड्रॉवर अशा कारणावरून बँकेकडून परत आले. विनायक पोतदार यांनी दिलेले धनादेश अनुक्रमे 1 कोटी 50 लाख 28 हजार 307 आणि 1 कोटी 52 लाख 38 हजार 623 इतक्या रकमांचे होते. मात्र, हे दोन्ही धनादेश बँकेकडून थांबवण्यात आले. यानंतर संबंधित व्यापार्‍यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. या प्रकरणात तक्रारदार चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोल्हापूर येथील सोन्याचा व्यापारी विनायक बंडूजी पोतदार व त्याचे सहकारी यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button