गुहागर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या अध्यक्षपदी सिद्धार्थ जाधव यांची निवड

आंबेडकरी चळवळीतील एकनिष्ठ कार्यकर्त्यांच्या नेतृत्वामुळे संघटनेला नवे बळ

गुहागर, दि. ०७ : खेड येथे नुकत्याच पार पडलेल्या उत्तर रत्नागिरी जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या मेळाव्यात विविध तालुक्यांच्या नवीन कार्यकारिण्यांची घोषणा करण्यात आली. या मेळाव्यात गुहागर तालुक्याच्या अध्यक्षपदी आंबेडकरी चळवळीतील एकनिष्ठ, अभ्यासू आणि जनसंपर्कात सक्रिय कार्यकर्ते सिद्धार्थ शिवराम जाधव (आबलोली) यांची सर्वसंमतीने निवड करण्यात आली.

या नियुक्तीची घोषणा रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षक सुशीम सकपाळ यांनी केली. त्यानंतर उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सादिक काझी यांच्या हस्ते नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा तसेच तालुक्यातील अनेक आंबेडकरी कार्यकर्ते, युवा आणि ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

तालुका महासचिवपदी माजी सैनिक सुनील जाधव (जानवळे) यांची निवड करण्यात आली असून इतर पदाधिकारी म्हणून उपाध्यक्ष शरद जाधव (तळवली), महेंद्र कदम (रानवी), सचिव विशाल सावंत (पाटपन्हाळे), आदेश पवार (धोपावे), प्रमुख संघटक शशिकांत सुर्वे (चिंद्रावळे), शैलेश घाग (पिंपर), संजय मोहिते (सुरळ) आणि सल्लागार म्हणून प्रकाश जाधव (दोडवली), विजय पवार (तळवली) यांची निवड करण्यात आली आहे.

सिद्धार्थ जाधव हे सेवानिवृत्त शिक्षक असून त्यांनी शैक्षणिक, सामाजिक आणि संघटनात्मक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. प्राथमिक शिक्षक, उच्चश्रेणी मुख्याध्यापक आणि नंतर केंद्रीय प्रमुख म्हणून त्यांनी दीर्घ सेवा दिली. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या अनुभवासह आंबेडकरी आणि परिवर्तनवादी चळवळीशी असलेली त्यांची नाळ आजही घट्ट आहे.

१९९७ पासून बामसेफच्या चळवळीत कार्यरत राहून त्यांनी तालुकाध्यक्षपद सांभाळले आहे. तसेच कास्ट्राइब शिक्षक संघटनेचे ते माजी तालुकाध्यक्ष आणि सध्या जिल्हा कार्याध्यक्ष आहेत. संघटन बांधणी, कार्यकर्त्यांना दिशा देणे आणि विचारप्रबोधनात त्यांची भूमिका नेहमीच ठळक राहिली आहे.

त्यांच्या या नियुक्तीमुळे गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची संघटनात्मक ताकद वाढेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. “ज्यांनी आयुष्यभर आंबेडकरी चळवळीला अर्पण केलं, त्यांच्याच हातात संघटनेचं नेतृत्व आलं, याचा आम्हाला अभिमान आहे,” असे मत मेळाव्यातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

गुहागर तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या नव्या कार्यकारिणीने सामाजिक न्याय, समता आणि संविधानिक मूल्यांच्या अधिष्ठानावर संघटना अधिक सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button