
नाटे येथे पोषण आहाराचा तांदूळ चोरण्याचा प्रयत्न
जागरूक नागरिकांमुळे प्रकार उघडकीस : नाटे सागरी पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसह दोन सहायक शिक्षकावर गुन्हा दाखल


राजापूर : तालुक्यातील नाटे येथील नाटेनगर विद्यामंदिर व कला वाणिज्य (संयुक्त) कनिष्ठ महाविद्यालय येथे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आलेला पोषण आहाराचा तांदूळ चोरीचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. बुधवारी (५ नोव्हेंबर) मध्यरात्री अशा प्रकारे शाळेच्या गोदामातून पोषण आहाराच्या धान्याची पोती चोरून नेणारी गाडी पकडून हा प्रकार उघड केला आहे. या प्रकरणी मकरंद धाक्रस यांनी पोलिसांकडे लेखी तक्रार दिली असून, तक्रारीची तात्काळ दखल घेत नाटे पोलिसांनी शाळेचे मुख्याध्यापक, सहाय्यक शिक्षक आणि दोन ग्रामस्थ अशा चारजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यात तांदूळ आणि गाडीसह एकूण ३ लाख ७ हजार ५०० रुपयांचा माल ताब्यात घेण्यात आला आहे.
शाळेत विद्यार्थ्यांसाठी आलेल्या पोषण आहाराच्या धान्यातील दहा तांदळाची पोती मध्यरात्री शाळेचे गोडाऊन उघडून गाडीत भरून घेऊन जाणाऱ्या दोन इसमांना गाडीसह स्थानिक जागरूक ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या हवाली केल्याने हा प्रकार उघड झाला असून यात खुद्द शाळेचे मुख्याध्यापक व सहाय्यक शिक्षकाचा सहभाग असल्याचे पुढे आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
५ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे ९.३० वाजता नाटेश्वर मंदिरात त्रिपुरापौर्णिमेचा उत्सव सुरू असताना मकरंद मधुसुदन धाक्रस (वय ३७, रा. नाटे भराडीन) हे मंदिरात उपस्थित होते. त्याच दरम्यान मध्यरात्री १.२४ वाजता मनोज आडविलकर (रा. नाटे) यांनी त्यांना नाटेनगर विद्यामंदिर येथे मुलांच्या पोषण आहारासाठी आलेला तांदूळ चोरून नेताना गावकऱ्यांनी एक गाडी पकडल्याची माहिती दिली.
त्यानंतर धाक्रस यांनी शाळेचे शिपाई रविकांत भगवान धामापुरकर यांना फोन करून शाळेत पोहोचले. शाळेच्या पटांगणात अशोक लेलॅन्ड कंपनीची गाडी (क्र. एमएच-०८-एपी-६९२७) उभी होती. या गाडीत ५० किलो वजनाची एकूण १० पोषण आहाराची पोती भरलेली आढळली.
ही गाडी कुणाल अनिल थळेश्री (रा. नाटे बांदचावाडी) याची असून त्याच्यासोबत सुनील वसंत डुगीलकर (रा. नाटे बांदकरवाडी) हेही उपस्थित होते. याबाबत त्यांना विचारणा केली असता सुनील डुगीलकर याने सांगितले की, “सहाय्यक शिक्षक नाना बीरा करे यांनी मला पोषण आहाराच्या खोलीची चावी देऊन दहा पोती तांदूळ काढून गाडीत भरा, पुढे कुठे पोहोचवायचे ते मी सांगतो,” असे सांगितले होते.”
शाळेच्या पटांगणातून गाडी बाहेर पडत असताना महमद इसा आयाज म्हसकर आणि महमद तलहा हनीफ हातोडकर (दोघे रा. साखरी-नाटे) यांना याबाबत संशय आल्याने त्यांनी ही गाडी थांबवली. या वेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने शाळेच्या आवारात जमा झाले.
यावेळी नाटे ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप रामचंद्र बांदकर हे देखील शाळेच्या मैदानावर उपस्थित होते. त्यांनी गाडी अडवलेल्या ग्रामस्थांना “प्रकरण तडजोडीत मिटवा” असे सांगून विनंती केल्याचे यावेळी उपस्थित काहींनी लोकांनी सांगितले. त्यानंतर ते स्वतःची दुचाकी शाईन मोटरसायकल तेथेच ठेवून निघून गेले, अशी माहिती पोलिसांच्या जबाबात नमूद करण्यात आली आहे.
शिक्षक व मुख्याध्यापकांचाही सहभाग
या प्रकाराबाबत शाळेचे शिपाई रविकांत धामपूरकर यांनी सांगितले की, गाडीत भरलेले तांदूळ हे विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी आलेले आहेत. या शाळेचे सहाय्यक शिक्षक नाना बीरा करे आणि मुख्याध्यापक रवींद्र तानु जाधव यांच्या सांगण्यावरूनच हा प्रकार घडल्याचे पोलीस तपासात पुढे आले असल्याचे सांगितले.
या शालेय पोषण आहारातील तांदळाची किंमत अंदाजे ७ हजार ५०० रुपये इतकी असून, गाडीची किंमत ३ लाख अशी मिळून सुमारे ३ लाख ७,५०० रुपयांचा माल ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी मकरंद धाक्रस यांच्या लेखी तक्रारीवरून नाटे सागरी पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवून पुढील कारवाई सुरू केली आहे. शासनाच्या मालमत्तेची चोरी, अत्यावश्यक वस्तू कायद्याचे उल्लंघन केले प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ चे कलम ३०३(२), ३०५(d), ३(५) तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ आणि ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास नाटेसागरे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार यु. सी. पिलनकर करत आहेत.
या प्रकरणे परिसरात खळबळ उडाली असून, खुद्द शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक असे कृत्य करत असतील तर मग त्यांच्याकडून विद्यार्थ्यांवर संस्काराची काय अपेक्षा ठेवायची, असा खडा सवाल आता ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. तसेच संस्था चालक नेमके काय करत आहेत, काही जागरूक ग्रामस्थांनी हा प्रकार उघड केल्याने हे बिंग फुटले आहे, मग यापूर्वीही असे प्रकार झाले नसतील कशावरून अशीही शंका उपस्थित होत असून पोलिसांनी याच्या मुळाशी जाऊन शोध घ्यावा, हा तांदूळ नेमका कोणाला विकला जाणार होता याचाही शोध घ्यावा, अशी मागणी नाटे ग्रामस्थांनी केली आहे.




