
धार्मिक स्थळे, रुग्णालये, किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणाच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यास निर्बंध..
रत्नागिरी, दि. 6 ) :- नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक कालावधीमध्ये जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, रुग्णालये किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणाचे जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यावर जिल्हादंडाधिकारी मनुज जिंदल यांनी निर्बंध घातले आहेत.
मा. राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक 2025 साठीचा कार्यक्रम 4 नोव्हेंबर 2025 रोजी घोषीत केला आहे. त्याअनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणूका 2025 आदर्श आचारसंहितेबाबत संदर्भिय एकत्रित आदेश निर्गमित केलेले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, रुग्णालये, किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणाच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यावर मा. राज्य निवडणूक आयोगाकडील 04 नोव्हेबर 2025 रोजीच्या आदेशान्वये आचारसंहिता कालावधीमध्ये जिल्हादंडाधिकारी मनुज जिंदल यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन निर्बंध घातले आहे.
प्रत्येक इसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनी क्षेपकावर पोलीस विभागाने जाहीर करुन प्रसिध्दी करावी, असेही आदेशात नमूद केले आहे.




