
कोकण रेल्वेच्या रो-रो सेवेत वापरल्या जाणार्या वॅगनची वहन क्षमता वाढणार
कोकण रेल्वे महामंडळाने आपल्या मालवाहतूक व्यवस्थत एक महत्त्वपूर्ण सुधारणा करत रोल-ऑन रोल-ऑफ (रो-रो) सेवेत वापरल्या जाणार्या वॅगनची वहन क्षमता ५० टनांवरून ५७टनांपर्यंत वाढवण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे कोकण रेल्वे मार्गावरील ट्रक वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार असून, जड व्यावसायिक वाहनांच्या वाहतुकीत लक्षणीय कार्यक्षमता वाढणार आहे.
जानेवारी १९९९ मध्ये सुरू झालेली कोकण रेल्वेची रो-रो सेवा ही देशातील पहिल्यांदाच सुरू झालेल्या प्रकारांपैकी एक असून, ही सेवा ट्रक थेट रेल्वे वॅगनवर लोड करून एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी नेते. या प्रणालीमुळे रस्त्यांवरील गर्दी, इंधन खर्च आणि चालकांचा थकवा कमी होतो, तसेच कार्बन उत्सर्जनावरही नियंत्रण मिळते.
विशेषतः लोखंड-पोलाद, संगमरवर, टाईल्स, सिमेंट, बांधकाम साहित्य आणि इतर औद्योगिक वस्तू वाहून नेणार्या ट्रकचालकांसाठी ही वाढीव क्षमता अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या निर्णयामुळे कोकण रेल्वेवरील मालवाहतुकीचा वेग आणि प्रमाण दोन्ही वाढण्याची शक्यता असून, कोकणातील उद्योग आणि व्यापाराला नवसंजीवनी मिळणार आहे.
www.konkantoday.com




