
अभिनय-दिग्दर्शनाच्या क्षेत्रात कोकणातील कलाकारांना अपार संधी : सागर देशपांडे
चिपळूणतर्फे रोहन मापुस्कर यांची दोन दिवसीय अभिनय कार्यशाळा
*
चिपळूणमध्ये नाट्य संमेलनाच्या निमित्ताने १९९५ साली नाटकाचे बीज रुजले आणि आज ते वृक्षासारखे फोफावले आहे. अभिनय, दिग्दर्शन आणि भूमिकेतील बदल या कलांचा आता राजकारण आणि समाजकारणातही वापर होत असल्याचे प्रतिपादन जडणघडण मासिकाचे संपादक, ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत डॉ. सागर देशपांडे यांनी केले.
ते अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा चिपळूण आणि इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय अभिनय कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी बोलत होते. या कार्यशाळेचे मार्गदर्शन दिग्दर्शक व कास्टिंग डिरेक्टर रोहन मापुस्कर यांनी केले.
कार्यशाळेचे उद्घाटन चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या हस्ते झाले. समारोपप्रसंगी परिषद अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन, असोसिएट डायरेक्टर इंद्रजीत भोसले, उद्योजक शिरीष चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. सागर देशपांडे म्हणाले, “पूर्वी सराव कार्यशाळा फारशा घेतल्या जात नव्हत्या, मात्र आता अभिनयाच्या प्रशिक्षणाला प्रगतीचा नवा वेग मिळाला आहे. महाराष्ट्रातील नाटकांची खरी परंपरा कोल्हापूरातून सुरू झाली. खाडिलकर, देवल, विष्णुदास भावे यांच्या कार्यातून ती समृद्ध झाली. हीच परंपरा आता कोकणातही नवे रूप घेत आहे. दिग्दर्शक व कास्टिंग डिरेक्टर रोहन मापुस्कर यांसारखे मार्गदर्शक मिळणे ही कोकणातील कलाकारांसाठी मोठी संपत्ती आहे. अभ्यासपूर्वक प्रयत्न केले, तर या क्षेत्रात कोकणातून क्रांती घडू शकते,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
देशपांडे पुढे म्हणाले, “जगात सध्या ७ हजारांहून अधिक बोली भाषा बोलल्या जातात. त्यातील ७० ते ८० भाषा दरवर्षी नष्ट होतात. मराठी ही जगात १५ व्या क्रमांकावर असून १२ ते १३ कोटी लोक ती बोलतात. ही भाषा, तिचं नाटक, आणि तिचा चित्रपट यांचं अस्तित्व टिकवणं आपली जबाबदारी आहे. अभिनय, दिग्दर्शन आणि चित्रपट क्षेत्रात जर आपल्याकडे गुणवत्ता आणि मेरिट असेल, तर कृत्रिम बुद्धिमत्तेला (AI) घाबरण्याचं काहीच कारण नाही,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
कार्यक्रमात सहभागी कलाकारांच्या वतीने संजय वाजे आणि मीरा पोतदार यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी मान्यवरांचे स्वागत केले, तर डॉ. सागर देशपांडे यांच्या हस्ते रोहन मापुस्कर यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. शिबिरात सहभागी झालेल्या कलाकारांनीही भेटवस्तू देऊन मापुस्कर यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश बांडागळे यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी सचिव डॉ. मीनल ओक, उपाध्यक्ष दिलीप आंब्रे, खजिनदार विभावरी रजपूत, आदिती देशपांडे, ओंकार लेडीज, योगेश कुष्टे, संजय कदम, श्रवण चव्हाण, समिधा बांडागळे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचा समारोप डॉ. प्रशांत पटवर्धन यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.




