
राजापूर रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाढलेले गवत, झाडी तोडण्याची मागणी…
राजापूर : राजापूर रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा गवत वाढले असून, दाट झालेल्या झाडीमुळे येथे अपघात घडत आहेत. या रस्त्यावरील झाडी त्वरीत तोडण्यात यावी, अशी मागणी दोनिवडेच्या सहयोग प्रतिष्ठानने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनामार्फत केली आहे.
“राजापूर पूल ते रेल्वेस्टेशन मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर गवत, झाडांच्या फांद्या वाढल्या आहेत. याबाबत आपल्या स्तरावरून अद्याप कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही. या मार्गावर वाढलेल्या झाडीमुळे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. या रस्त्यावरून प्रवास करत असताना वाहन चालवताना बऱ्याच ठिकाणी वाढलेल्या झाडीमुळे समोरून येणारे वाहन दिसत नसल्यामुळे वाहन चालकांची तारांबळ उडत आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे. यामुळे रस्त्यावर अपघात होऊन जीवितहानी झाल्यास किंवा कुणालाही दुखापत झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी आपल्या कार्यालयाची राहील,” असे या निवेदनात म्हटले आहे.
रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले गवत काढावे तसेच वाढलेली झाडी त्वरीत तोडण्यात यावी. अन्यथा या मार्गावरील उन्हाळे, दोनिवडे, पांगरे, शेंबवणे, ससाळे, सोल्ये आंगलेतील ग्रामस्थांच्या वतीने रोस्ता रोको करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. यावेळी अध्यक्ष अनंत गुरव, विष्णू शिरवडकर, प्रवीण तोरस्कर, संजय पवार, अमित पडवळ आदींसह प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.




