
भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचा पदाचा राजीनामा
मुलगी ठाकरे गटाकडून नगराध्यक्षपदाची उमेदवार?
रत्नागिरी : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजायला लागले असून, नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. येत्या महिनाभरातच या निवडणुकांची रणधुमाळी संपुष्टात येणार असल्याने स्थानिक राजकीय पक्षातील नेत्यांची मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी आज आपल्या पदाचा तडका फडकी राजीनामा दिला. मुलगी ठाकरे शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरत असल्याने धर्म संकटातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
रत्नागिरीतील भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी तडकाफडकी आपला जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. चिपळूणमधील भाजपच्या एका कार्यक्रमातच त्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे आपला जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे, अनेकांच्या भुवया उंचावल्या.
भाजपमध्ये राजेश सावंत यांच्याकडे दक्षिण रत्नागिरीचा जबाबदारी होती; मात्र, नगरपालिका निवडणुकांपूर्वीच त्यांनी पदाचा राजीनामा दिला असून लेकीसाठी बापाने राजकीय करिअरवर पाणी सोडल्याची चर्चा मतदारसंघात होत आहे. राजीनाम्याचे कारण अद्याप स्पष्ट नसले तरी मुलीला ठाकरे गटातून नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळणार असल्याने वडिलांनी राजीनामा दिल्याची माहिती आहे.




