
पालकमंत्र्यांच्या शेजारी बसलो, गाडीतून फिरलो म्हणजे उमेदवारी मिळेल या भ्रमात राहू नये -ना. उदय सामंत यांचा पदाधिकार्यांना डोस
पालकमंत्र्यांच्या शेजारी बसलो, गाडीतून फिरलो, उजवा-डावा म्हणून नाव घेतलं गेलं म्हणजे निवडणुकीत उमेदवारी नक्की मिळेल, अशा कोणत्याही भ्रमात कुणीही राहू नका, अशा स्पष्ट शब्दात पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी पदाधिकार्यांना फटकारत चांगलाच डोस दिला. निष्ठावंत, जनतेतून मागणी आणि पक्षासाठी केलेल्या कामांची नोंद यावरच उमेदवार निश्चित होईल. एका जागेसाठी अनेक इच्छूक असतील तर थांबायची तयारी ठेवा, अशी समजही यावेळी ना. सामंत यांनी दिली.
जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील अतिथी सभागृहात शहर व तालुका शिवसेना पदाधिकारी आणि इच्छूक उमेदवारांच्या उपस्थितीत बैठक झाली. ना. उदय सामंत यांनी नगर परिषदेच्या प्रभागनिहाय इच्छूकांचा आढावा घेतला. यावेळी काही प्रभाग मित्र पक्षांसाठी सोडल्याचे समजल्यानंतर ना. सामंत यांनी सर्व प्रभागांतून इच्छुकांचे अर्ज मागवा. निवडणुका महायुती म्हणून लढवल्या जाणार असल्या तरी युद्धात व निवडणुकीत गाफील राहून चालत नाही. त्यामुळे तयारी पूर्ण असणे गरजेचे असल्याचे सांगितले. दुसर्या पक्षातून कुणी आपल्याकडे येणार असेल आणि त्याचा नगराध्यक्षपद निवडणुकीसाठी फायदा होणार असेल तर ऐनवेळी त्याचाही विचार करावा लागणार आहे. नगराध्यक्षपदासाठी उमेश सकपाळ व सुधीर शिंदे अशा दोघांनी इच्छूक असल्याचे सांगितले. तर इतर ठिकाणी एकापेक्षा जास्त इच्छुकांची संख्या असल्याने शक्यतो लोकांसमोर बसून एकाच नावावर एकमत करा अन्यथा यादी तयार करून ती पक्षाकडे पाठवली जाईल, तेथून निर्णय होईल असे सांगितले.www.konkantoday.com




