
पारोसाच्या मोहापायी नदी ओलांडून पलिकडे जात असताना तरूणाचा बुडून मृत्यू
पारोसची भाजी काढण्यासाठी नदी ओलांडून जात असताना पाण्यात बुडून ३५ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना देवरुख नजिकच्या पूर बौद्धवाडी येथे रविवारी घडली. अजय अशोक कांबळे असे मृत तरूणाचे नाव आहे.
देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार आशुतोष अशोक कांबळे यांनी फिर्याद दिली आहे. अजय कांबळे हा मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकत होता. अजय हा रविवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास पत्नी समवेत सप्तलिंगी नदीपात्रावरील देवरहाट येथे कपडे धुण्याकरिता गेला होता. त्या ठिकाणी गेल्यानंतर नदीपलिकडे त्याला पारोसाची भाजी दिसली. भाजी आणण्याकरिता नदीपलिकडे जाण्यासाठी अजयने पाण्यात उडी घेतली. त्याला पोहता येत नसल्याने गटांगळ्या खात पाण्याबरोबर वाहू लागला. पत्नीने आरडाओरड केली. मात्र जवळ कोणीच नसल्याने मदत मिळाली नाही. पत्नीने घराकडे धाव घेत हा प्रकार आशुतोष कांबळे यांना सांगितला. आशुतोष व गावातील ग्रामस्थांनी नदीच्या दिशेने धाव घेतली. ग्रामस्थांनी नदीपात्रात उडी घेत अजयचा शोध घेतला मात्र तो सापडला नाही. अजयचा शोध घेण्यासाठी निवळी येथील रमेश सावंत व सहकारी यांना बोलावण्यात आले. सायंकाळी ४.३० वाजण्याच्या दरम्यान अजय सापडला. त्याला देवरूख ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय सूत्रांनी तपासणी करून मृत घोषित केले.www.konkantoday.com




