दहावी बारावी लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर


रत्नागिरी, दि. 3 ):- फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इयत्ता दहावी लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा आयोजित करण्यात येणार आहेत.
इयत्ता बारावीसाठी घेतली जाणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (सर्वसाधारण, द्विलक्षी व व्यवसाय अभ्यासक्रम तसेच माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांची ऑनलाईन परीक्षा) मंगळवार, 10 फेब्रुवारी, 2026 ते बुधवार, 18 मार्च, 2026 या दरम्यान तर प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच एनएसक्यूएफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा (माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेसह) शुक्रवार, 23 जानेवारी, 2026 ते सोमवार, 09 फेब्रुवारी, 2026 या दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे.
इयत्ता दहावीसाठी घेतली जाणारी माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा शुक्रवार, 20 फेब्रुवारी, 2026 ते बुधवार 18 मार्च, 2026 या दरम्यान तर प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा ( शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र व गृहशास्त्र विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेसह ) सोमवार, 02 फेब्रुवारी, 2026 ते बुधवार, 18 फेब्रुवारी, 2026 या दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे.
वरील सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर 31 ऑक्टोबर 2025 पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे.
मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय यांचेकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच सोशल मिडीया किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राहय धरू नये. यामुळे विद्यार्थ्याचे नुकसान झाल्यास मंडळ जबाबदार राहणार नाही याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. असे आवाहन कोकण विभागीय मंडळाच्या विभागीय सचिव पुनिता गुरव यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button