कोकणातील भातशेतीचे मोठे नुकसान; शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी :आ. शेखर निकम

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन सादर

चिपळूण (): कोकणात गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या अवकाळी पाऊस, वादळे आणि परतीच्या पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काढणीला आलेला भात पावसामुळे भिजून आडवा पडल्याने अनेक भागात पिके सडू लागली असून काही ठिकाणी पिकांना पुन्हा कोंब फुटले आहेत. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांवर गंभीर आर्थिक संकट ओढवले आहे.

या पार्श्वभूमीवर कोकणातील भातशेतीला तातडीची आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. नुकत्याच मुंबईत झालेल्या भेटीत आ. निकम यांनी ही परिस्थिती सविस्तर मांडली.

यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी “शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाईल” अशी ग्वाही दिली.

कोकणातील अनेक शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह भातशेतीवर आधारित असून, यावर्षीच्या या नैसर्गिक आपत्तीने त्यांचे आर्थिक चित्र बिघडवले आहे. मराठवाडा व विदर्भातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळालेल्या मदतीच्या धर्तीवर कोकणातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही तत्काळ भरपाई जाहीर करण्यात यावी, अशी स्पष्ट मागणी आ. निकम यांनी केली.

तसेच चिपळूण मध्यवर्ती बसस्थानकाच्या इमारती संदर्भातही आ. निकम यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्याशी चर्चा केली.

“शेतकऱ्यांना ठोस नुकसानभरपाई मिळेपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवणार आहोत,” असे आमदार शेखर निकम यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button