
‘सत्याचा मोर्चा’ प्रकरण : मनसेच्या उपाध्यक्षांसह ६ जणांविरोधात गुन्हा दाखल!
मुंबई : महाविकास आघाडी आणि मनसेने शनिवारी मुंबईत काढलेल्या ‘सत्याच्या मोर्चा’ प्रकरणी आता पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. आझाद मैदान पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) उपाध्यक्ष बाळा नांदगावकर यांच्यासह ६ पक्ष पदाधिकाऱ्यांवर परवानगी न घेता मोर्चा काढल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.
‘महाविकास आघाडी’आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्या वतीने मतदार यादीतील अनियमितता, मतदार माहितीचा गैरवापर आणि निवडणूक आयोगाच्या निष्काळजीपणाच्या विरोधात शनिवारी ‘सत्याचा मोर्चा’ आयोजित करण्यात आला होता. या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रमुख शरद पवार, काँग्रेस नेते, शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते. आयोजकांनी आंदोलनासाठी कोणतीही परवानगी घेतली नव्हती. या मोर्च्याच्या निमित्ताने महापालिका मार्गावर हजारो नागरिक जमले होते. दक्षिण मुंबईत मनाई आदेश लागू असल्याने आंदोलन, मोर्चाचे आयोजन करण्यास बंदी असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. तरीही संबंधित पक्षांनी मोर्चा आयोजित केला, असे आझाद मैदान पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
यामुळे आझाद मैदान पोलिसांनी मनसे नेते बाळा नांदगावकर, बाबन महाडिक, अरविंद गावडे, संतोष शिंदे, बाबन घरत, जयवंत नाईक आणि इतरांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ आणि मुंबई पोलीस अधिनियम कलम ३७ (३) आणि १३५ अंतर्गत बेकायदेशीर जमाव जमवणे आणि शासन आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले.




