
रत्नागिरीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ‘शहर परिवर्तन पदयात्रेला’ प्रारंभ
श्री देव भैरीच्या दर्शनाने शुभारंभ; बाळ माने यांच्या नेतृत्वाखाली शहरातील सर्व प्रभागातून पदयात्रा…
रत्नागिरी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ‘रत्नागिरी शहर परिवर्तन पदयात्रेला’ (रविवारी उत्साहात सुरुवात झाली. सकाळी रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरीच्या दर्शनाने या पदयात्रेचा शुभारंभ झाला. पक्षाचे उपनेते आणि माजी आमदार बाळ माने यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा रत्नागिरी शहरातील सर्व प्रभागांतून निघाली असून, नगरपरिषद निवडणूक जाहीर होण्यापूर्वी शहरातील विविध समस्यांकडे लोकांचे लक्ष वेधण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे.
या प्रसंगी बोलताना बाळ माने म्हणाले की, “रत्नागिरीच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या प्रश्नांच्या समाधानासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महाविकास आघाडी कटिबद्ध आहे. आगामी नगरपरिषद निवडणुकीत रत्नागिरीकरांनी या पक्षाला आपला आशीर्वाद द्यावा,” असे आवाहन त्यांनी केले.
पहिल्या सत्रात पदयात्रेची सुरुवात भगवती मंदिर येथून झाली. या पदयात्रेचा मार्ग दत्त मंदिर किल्ला, मारुती मंदिर पठाणवाडी किल्ला, सांब मंदिर किल्ला, भाटकर वाडा, ज्योतिबा मंदिर, राम मंदिर, सरकार वाडी मार्गे भैरी मंदिर येथे सांगता करण्यात आली.
सायंकाळच्या सत्रात पदयात्रा विठ्ठल मंदिर भडंग नाका येथून निघून सदानंद वाडी, मांडवी मंदिर, मांडवी बीच हनुमान मंदिर, मांडवी नाका, दत्त मंदिर गुढे वठार, चवंडे वठार, तेली आळी, संत तुकडोजी महाराज मंदिर, राम मंदिर मार्गे रत्नागिरी बसस्थानक येथे सांगता झाली.
शहरातील 10, 11, 14 आणि 15 या प्रभागांमधून निघालेल्या या पदयात्रेला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, उपशहरप्रमुख नितीन तळेकर, सलील डाफळे, शहर संघटक प्रसाद सावंत, विभागप्रमुख अमित खडसोडे, राजन शेट्टे, प्रशांत सुर्वे, राजाराम रहाटे, रोहित मयेकर, प्रकाश गुरव, माजी नगरसेविका रशिदा गोदड, राजश्री शिवलकर, सेजल बोराटे, उन्नती कोळेकर, विजया घुडे, पुजा जाधव, रमीजा तांडेल, सालिया वस्ता, स्मिता काटकर, शिरधनकर मॅडम, मयेकर मॅडम, दिलावर गोदड, बाबू बंदरकर, राजू सुर्वे, साजिद पावसकर, मुद्दसर तांडेल, बिपीन शिवलकर आदी शिवसेना (उबाठा) पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
उबाठाच्या पदयात्रेच्या निमित्ताने शहरभर भगवे झेंडे आणि घोषणांनी वातावरण भारावून गेले होते. पदयात्रे दरम्यान नागरिकांनी ठिकठिकाणी उस्फूर्तपणे कार्यकर्त्यांचे स्वागत केले. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही पदयात्रा शिवसेनेच्या जनसंपर्क मोहिमेचा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.




