
दहावी-बारावीच्या परीक्षेपूर्वी बोर्डाचा मोठा निर्णय! परीक्षा केंद्रावरील प्रत्येक वर्गात आता सीसीटीव्ही असणार,
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेळापत्रकानुसार यंदा इयत्ता बारावीची लेखी परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ पर्यंत होणार आहेदहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ दरम्यान पार पडेल. परीक्षेपूर्वी सर्वच केंद्रांची पडताळणी होणार आहे. आता परीक्षा केंद्रावरील प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरा, त्या शाळेला पक्की संरक्षक भिंत असणे बंधनकारक आहे.
दहावी- बारावीची परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी यंदाही सरमिसळ (वेगवेगळ्या शाळांचे विद्यार्थी एकमेकांमागे) पद्धत असणार आहे. गतवर्षी ज्या परीक्षा केंद्रांवर कॉपीचे प्रकार घडले, त्यांची मान्यता रद्द केली जाणार आहे. त्यावेळी सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे वेळेत शक्य नव्हते. त्यामुळे पर्यवेक्षकांचे मोबाईल कॅमेरे सुरू करून त्या निगराणीखाली परीक्षा पार पडली होती.
आता प्रत्येक केंद्रावरील सर्व वर्गात सीसीटीव्ही कॅमेरा बंधनकारक आहे. त्यासाठी त्या केंद्रांना १५ दिवसांची मुदत दिली जाणार आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे परीक्षा काळातील रेकॉर्डिंग ३० दिवसांपर्यंत जतन करून ठेवले जाणार आहे. आगामी परीक्षा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेतच होईल, असेही बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
…तर केंद्रांची मान्यता होणार रद्द
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा केंद्रांची १५ नोव्हेंबरपासून पडताळणी केली जाईल. आता ज्या केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे, पक्की भिंत, स्वच्छतागृह अशा महत्त्वाच्या सुविधा नाहीत, त्या केंद्राची मान्यता रद्द होईल. त्याअनुषंगाने मागच्या आठवड्यातील बैठकीत सक्त सूचना केल्या आहेत


