
अभूतपूर्व कामगिरीबद्दल बीसीसीआय कडून संपूर्ण इंडिया टीमला ५१ कोटी रुपयांचे मोठे बक्षीस जाहीर
नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील मैदानावर भारतीय क्रिकेट संघाच्या महिला खेळाडूंनी नवा इतिहास रचला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेला धुळ चारत वनडे विश्वचषकावर नाव कोरले.भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर २९९ धावांचे आव्हान ठेवले होते, प्रत्यूतरात दक्षिण आफ्रिकेची संपूर्ण टीम 246 धावांवरच गारद झाली. या विजयानंतर बीसीसीआयने टीम इंडियासाठी मोठ्या बक्षिसाची घोषणा केली आहे.
बीसीसीआयने केली मोठी घोषणा|
भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी विश्वचषक जिंकून देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. या अभूतपूर्व कामगिरीबद्दल बीसीसीआयने संपूर्ण टीमला ५१ कोटी रुपयांचे मोठे बक्षीस जाहीर केले आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी ही घोषणा केली, ज्यात खेळाडूंसह कोचिंग स्टाफ, निवड समिती आणि सहयोगी कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
सैकिया यांनी या विजयाचे श्रेय देताना आयसीसीचे चेअरमन जय शाह यांच्या दूरदृष्टीचे कौतुक केले. शाह यांनी महिला क्रिकेटमधील पुरस्काराच्या रकमेत ३००% ची ऐतिहासिक वाढ केल्यामुळे हा सन्मान करणे शक्य झाले, असे त्यांनी स्पष्ट केले. या वाढीमुळे महिला क्रिकेटला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नवा आयाम मिळाला आहे.




