
सडे जांभारी येथे लोकप्रतिनिधी आणि लोकसहभागातून सार्वजनिक नवीन रस्ता आणि वनराई बंधाऱ्याचे काम पूर्ण
गुहागर तालुक्यातील सडे जांभारी येथे लोकप्रतिनिधी आणि लोकसहभागातून सार्वजनिक नवीन रस्ता आणि वनराई बंधाऱ्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
गुहागर तालुक्यातील मौजे सडे जांभारी, अमरवाडी, येथील बाळ गोपाळ गणेश मंडळ आणि गौराई माता सेवा मंडळ यांच्या संयुक्त आयोजनाने दोन्ही मंडळातील स्थानिक ग्रामस्थ व महिला मंडळ सोबत दिवाळीच्या सुट्टीत गावी आलेले मुंबईकर तरुण मंडळीं या सर्वानी मिळून एक वेगळा निर्णय घेत एक दिवस सार्वजनिक कामास द्यावा असा ठराव केला गेला. त्याला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष महेश नाटेकर आणि त्यांचे सहकारी संतोष बारस्कर यांचे योगदान लाभले.
या कामास श्री. नाटेकर यांनी दोन दिवस विनामूल्य जेसीबी उपलब्ध करून त्याद्वारे सडे जांभारी येथील कोंडवी कातळसडा ते जांगलदेव मंदिर (चराची नदी) पर्यंत व गणपती विसर्जन, गुरांची पायवाट व शेतीवाडीसाठी जाण्या-येण्याची अडचण आणि गैरसोयीची असलेल्या जागेचे एका सामान्य रस्त्यात रूपांतर करण्यात यश आले. त्यासोबतच नदीवर वार्षिक वनराई बंधारा आणि जांगलदेव परिसराची साफसफाई व डागडूगीचे काम करण्यात आले. स्थानिक ग्रामस्थ पांडुरंग बारस्कर, गोविंद लक्ष्मण वेलुंडे, गणपत पांडुरंग वेलुंडे, अनंत भागोजी वेलुंडे यांचे मार्गदर्शन लाभले.
या श्रमदानाला एका दिवसासाठी खास मुंबईवरून येऊन काही तरुण मंडळींनी सहभाग नोंदवला होता व ज्यांना गावी येणे शक्य नव्हते त्यांनी आर्थिक पाठबळ देण्याचे सहकार्य केले. या रस्त्याचे काम सध्या अगदीच प्राथमिक स्वरूपाचे असले तरी भविष्यात त्याचे चांगल्या रस्त्यात रूपांतर होऊन येथील सर्व स्थानिक लोकांना त्याचा खूप मोठा उपयोग होऊ शकतो, असे मत सर्वांनी व्यक्त केले. गैरसोय दूर केल्यामुळे श्री. नाटेकर यांचे आभार व्यक्त केले.




