
वादळामध्ये भरकटल्या चार मासेमारी नौका
नौकांवरील ३० खलाशी किनाऱ्यावर सुखरूप
गुहागर : वादळामध्ये भरकटलेल्या चार मासेमारी नौका व त्यावरील ३० मच्छिमार बांधव किनाऱ्यावर सुखरूप पोहोचले आहेत. यामध्ये करंजा मच्छीमार सोसायटीच्या चंद्राई व गावदेवी मरीन या दोन बोटी, तर तालुक्यातील वेलदूर मच्छिमार सहकारी संस्थेची बाप्पा मोरया ही एक बोट आणि दापोली तालुक्यातील कोळथरे सोसायटीची साईचरण बोट यांचा समावेश आहे.
या चार बोटी मच्छीमारीसाठी खोल समुद्रामध्ये गेल्या होत्या. गेले सहा दिवस अरबी समुद्रात झालेल्या चक्रीवादळामुळे बोटी भरकटल्याने बोटींशी संपर्क होत नव्हता. आज (३१ ऑक्टोबर) या बोटींशी संपर्क झाला. या चारही बोटी व बोटीवर काम करणारे एकूण ३० खलाशी सुखरूप असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
दरम्यान नवानगर मच्छिमार सहकारी सोसायटी लि. या संस्थेच्या वतीने आमदार भास्कर जाधव यांना तात्काळ शासकीय सहकार्य मिळण्यासाठी निवेदन दिले होते. आमदार जाधव यांनी या निवेदनाची दखल घेऊन शासकीय यंत्रणेला तात्काळ शोध कार्याचे आदेश दिले व त्वरित शोध कार्य सुरू झाले.
या चार या नौकांसह सुमारे ३० ते ३५ मच्छीमार बांधव बेपत्ता झाले होते. या घटनेची माहिती करंजा मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्थेमार्फत इंडियन कोस्ट गार्ड तसेच मत्स्य व्यवसाय विभाग यांना २८ ऑक्टोबर रोजी ई-मेलद्वारे कळविण्यात आली होती.
बेपत्ता झालेल्या नौकांवरील सर्व खलाशी वर्ग हा गुहागर तालुक्यातील असून तालुक्यातील स्थानिक मच्छीमार, कार्यकर्ते २६ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत वेगवेगळ्या मार्गांनी बोटींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. कोणत्याही शासकीय यंत्रणेकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याचे नवानगर मच्छीमार सहकारी सोसायटीने आमदार भास्कर जाधव यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. तसेच इंडियन कोस्ट गार्ड, मुंबई व मत्स्य व्यवसाय विभाग, मुंबई यांच्या शोधकार्यामध्येही दिरंगाई होत असल्याचे दिसून येत असल्याचेही दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
त्यामुळे या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, तात्काळ संबंधित शासकीय विभागांना आवश्यक त्या सूचना देऊन बेपत्ता नौका व मच्छीमार बांधव यांच्या शोधकार्याला गती द्यावी, तसेच सहकार्य व मदतकार्य तातडीने उपलब्ध करून द्यावे, ही विनंतीही आमदार जाधव यांना करण्यात आली होती. आमदार जाधव यांनी त्वरित दखल घेऊन संबंधित शासकीय यंत्रणेला सूचना दिल्या होत्या. बेपत्ता झालेल्या चार नौका व ३० खलाशी सुखरूप असल्याची माहिती प्राप्त होताच सर्वांनी आनंद व्यक्त केला.




