
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आक्षेपार्ह व्हिडीओप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी..
दापोली : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्याविषयी राजकारण विदर्भाचे यांनी आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसिद्ध केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या दापोली तालुका शाखेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात दापोली पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे.
“राजकारण विदर्भाचे या फेसबुक पेजवरून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने करून समाजामध्ये तेढ निर्माण होईल, असे कृत्य राजकारण विदर्भाचे यांनी केले असून या प्रकाराने दापोली तालुक्यातील संपूर्ण बौद्ध समाज अस्वस्थ झाला आहे. भविष्यात हे प्रकरण वेगळे वळण घेऊ शकते. भविष्यात अशी घटना टाळण्यासाठी दापोली पोलिसांनी स्वतः दखल घेऊन या प्रकरणाबाबत तक्रार नोंदवावी”, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
या पत्रावर पवन धोत्रे, मधुकर मर्चंडे, अनंत जाधव, अनंत शेळके, तानाजी जाधव, प्रथमेश जाधव, विशाल आयरे, मुकुंद कासारे यांची नावे आहेत. हे निवेदन दापोली पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा हिरेमठ यांनी स्विकारले.




